ओमराजेंचे आव्हान दानवेंनी स्वीकारले; ‘उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर धाराशिवमधून लढणार’

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगत माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आव्हानाला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी दानवे यांना जनतेतून निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्यावर दानवे यांनी ‘लढायचे असेल तर लढावे, मोस्ट वेलकम’ असे म्हणत हे आव्हान स्वीकारल्याचे संकेत दिले.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या दौऱ्यात दानवे यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

‘पक्षाने सांगायची गरज नाही, लढायचे असेल तर लढावे’

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याला दिलेले आव्हान स्वीकारताना दानवे म्हणाले की, केवळ चॅलेंज स्वीकारून चालत नाही, तर जनतेत राहून काम करावे लागते. पक्षाने सांगण्याची वाट पाहण्याची गरज नसून, निवडणूक लढवायची इच्छा असेल तर लढावे, असे म्हणत त्यांनी ओमराजेंना प्रत्युत्तर दिले.

‘उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास धाराशिवमधून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. लढायचे असेल तर लढावे, मोस्ट वेलकम,’ अशा शब्दांत दानवे यांनी आपली भूमिका मांडली.

‘मी जनतेतून निवडून आलोय’

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना दानवे यांनी आपण जनतेतून निवडून येत राजकारणात पुढे आल्याचे सांगितले. वडिलांच्या नावाचा किंवा सहानुभूतीचा आधार घेत राजकारणात आलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जनतेतून निवडून येऊन माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. वडिलांच्या नावावर किंवा कोणाच्या सहानुभूतीवर मी निवडून आलेलो नाही. अनेक वर्षे पक्ष संघटनेचे काम केले आहे,’ असे दानवे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

खासदार ओमराजेंवर फोन न उचलण्यावरून टीका

अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. ओमराजे फोन उचलतात, असा सोशल मीडियातून प्रचार केला जात असल्याचा दावा करत त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले.

‘मी अनेक वेळा दहा-दहा वेळा फोन केला आहे. त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर चार तासांनी फोन केला जातो. अशी अवस्था असेल तर सामान्य जनतेचे काय?’ असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

‘काय होतास तू, काय झालास तू’ या टीकेनंतर वादाला सुरुवात

काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशा शब्दांत निशाणा साधला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी दानवे यांनी प्रथम जनतेतून निवडून यावे, असे आव्हान दिले होते.

ओमराजे यांच्या या आव्हानानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता दानवे यांनीही हे आव्हान स्वीकारत धाराशिवमधून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केल्याने आगामी काळात या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या दोन्ही नेते एकाच पक्षातील असल्याने उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील या वक्तव्यांनंतर आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!