कर्जवसुलीच्या नोटिसा थांबवा; बँकांवर कारवाई करा, प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे मदत केंद्र सुरू करणार
यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असून, सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत तातडीने पोहोचणे गरजेचे आहे. मदत टप्प्याटप्प्याने न देता एकरकमी स्वरूपात द्यावी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी नेमकी कोणती मदत केली जाणार आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसमोर स्पष्टपणे जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतीची स्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पीक विमा, मागील वर्षाची प्रलंबित मदत आणि बँकांकडून सुरू असलेल्या कर्जवसुलीच्या नोटिसांबाबत त्यांनी माहिती घेतली.
‘कागदावर दुष्काळ जाहीर झाला, आता मदत बांधावर पोहोचवा’

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सॅटेलाइट इमेजच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर परिस्थिती वेगळी आणि अधिक गंभीर असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पिके वरून हिरवी दिसत असली तरी त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून चालणार नाही, तर तातडीने मदत देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यातील मोठ्या भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकार, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी केवळ कार्यालयात न बसता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पीक विम्याची रक्कम आणि मागील वर्षाची मदत अद्याप प्रलंबित
पीक विम्याची रक्कम तसेच मागील वर्षी जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एका बाजूला नुकसान भरपाईची रक्कम प्रलंबित असताना दुसऱ्या बाजूला काही बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठविल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
कर्जवसुलीची प्रक्रिया सध्याच्या परिस्थितीत थांबवली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी बँकांना याबाबत स्पष्ट निर्देश देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘मुख्यमंत्र्यांना एक दिवसाची संधी देऊ’

सरकारवर तातडीने टीका करण्याऐवजी मुख्यमंत्री नेमकी काय मदत करणार आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांना एक दिवसाची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. मात्र, ही मदत केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत बिकट असून, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा परिणाम सहन करावा लागत आहे. काही कुटुंबांकडे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यासाठीही पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे मदत केंद्र

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मदत आणि समुपदेशन मिळावे, तसेच सरकारी मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून मदत केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.
शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार, तिचे स्वरूप काय असेल आणि ती कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘सुपर अल निनोचा परिणाम शेतीसह रोजगारावरही होऊ शकतो’
पावसाच्या अनिश्चिततेबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी ‘सुपर अल निनो’च्या संभाव्य परिणामाचा मुद्दा उपस्थित केला. पाऊस कमी पडल्यास शेती क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यातून बेरोजगारीचे संकटही वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
हवामानातील बदलामुळे कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाच्या परिणामांवर गांभीर्याने चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बोलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
दुष्काळ हा केवळ एक-दोन महिन्यांचा प्रश्न नसून त्याचा परिणाम शेती, रोजगार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ होऊ शकतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने उपलब्ध मदत निधीचा प्रभावी वापर करून तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, संजय निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
