कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील बोगद्यांची कामे तातडीने पूर्ण करा; सुजितसिंह ठाकूरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यात भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांची मागणी

यशश्री अपडेट्स | धाराशिव :

धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत नीरा-भीमा जोड बोगदा आणि जेऊर बोगद्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने मोठा आधार मिळू शकतो. मात्र, विविध प्रशासकीय व तांत्रिक त्रुटींमुळे पूर्वी रद्दबातल झालेल्या या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे पुनरुज्जीवन झाल्याचे सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

प्रकल्पाच्या कामासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता, जलविज्ञान विभागाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाची पाणी मान्यता तसेच आवश्यक निधीची तरतूद यांसारख्या बाबींच्या अभावामुळे प्रकल्पास अडथळे निर्माण झाले होते. या त्रुटी दूर करून प्रकल्पाला पुन्हा गती देण्यात आली. मात्र, क्षेत्रीय पातळीवर दोन्ही बोगद्यांचे थोडेच काम शिल्लक असतानाही गेल्या साडेतीन वर्षांपासून ही कामे ठप्प असल्याकडे ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

दोन्ही बोगद्यांचे अत्यल्प काम शिल्लक

जेऊर बोगद्याची एकूण लांबी 27 किलोमीटर असून त्यापैकी केवळ सुमारे 700 मीटरचे काम बाकी आहे. त्याचप्रमाणे नीरा-भीमा जोड बोगद्याची लांबी 23.6 किलोमीटर असून त्यातील केवळ 1.6 किलोमीटरचे काम पूर्ण होणे बाकी असल्याचे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे प्रकल्पातील या दोन्ही महत्त्वाच्या कामांना तातडीने गती देऊन ती पूर्णत्वास नेण्याची मागणी करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात कृष्णेचे अतिरिक्त पाणी उजनी जलाशयात उपलब्ध झाल्याशिवाय जिल्ह्याला या प्रकल्पाचा अपेक्षित पाणी लाभ मिळणार नाही. त्यामुळे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करून उजनीमार्गे धाराशिव जिल्ह्यात पाणी आणण्याच्या प्रक्रियेला वेग देणे आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

25,800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या 7 टीएमसी पाण्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 25 हजार 800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने सामना करणाऱ्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

उपसा सिंचन योजनाही पूर्ण करण्याची मागणी

यासोबतच परंडा व भूम तालुक्यातील उपसा सिंचन योजना क्रमांक 1 ते 5 यांची कामेही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात सध्या पावसातील खंड, पीक नुकसानीची परिस्थिती आणि पाणीटंचाईची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत दीर्घकालीन सिंचन प्रकल्पांना गती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांची दखल घेऊन प्रलंबित बोगद्यांच्या कामांसह उपसा सिंचन योजनांना तातडीने गती द्यावी, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

error: Content is protected !!