२७, २८ व २९ सप्टेंबरला विशेष अभियान राबविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
यशश्री अपडेट्स | परंडा
भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय ओळखपत्रे, प्रमाणपत्रे तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी परंडा तालुक्यात २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कागदपत्रे व प्रमाणपत्र शिबिर आयोजित करावे, अशी मागणी भटके-विमुक्त विकास परिषदेकडून करण्यात आली आहे.
याबाबत भटके-विमुक्त विकास परिषदेचे परंडा तालुका संयोजक सोमनाथ बोडरे यांनी पुढाकार घेत २२ सप्टेंबर रोजी परंडा तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनासोबत संबंधित शासन निर्णय, परिपत्रक तसेच अभियानासंदर्भातील आवश्यक कागदपत्रेही सादर करण्यात आली.
विविध कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी
या विशेष अभियानांतर्गत भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आयुष्मान भारत कार्ड यांसह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची शिबिरात उपस्थिती ठेवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना यांसह इतर शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन

भटके-विमुक्त समाजातील ज्या नागरिकांकडे आवश्यक शासकीय कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे नाहीत, त्यांनी या विशेष अभियानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन सोमनाथ बोडरे यांनी केले आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सुविधा, कागदपत्रे आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने सर्व भटके-विमुक्त समाजबांधवांनी या अभियानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी भटके-विमुक्त विकास परिषदेचे परंडा तालुका संयोजक सोमनाथ बोडरे आणि तालुका सहसंयोजक शशिकांत चोरमले उपस्थित होते.
