धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यशश्री अपडेट्स | परंडा

धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण तसेच वारंवार पडलेल्या पर्जन्यखंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसह प्रमुख पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान, प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा आणि भूजल पातळीतील घट याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.

५ लाख ३९ हजार हेक्टरवर खरीप पेरणी

परंडा, भूम, वाशी, तुळजापूर, धाराशिव, कळंब, उमरगा आणि लोहारा या आठही तालुक्यांत २०२६ च्या खरीप हंगामात एकूण ५,३९,०२७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून ४,६७,३२२ हेक्टरवर (८६.७० टक्के) सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यानंतर तूर ३४,८३१ हेक्टर (६.६४ टक्के), उडीद २१,८८६ हेक्टर (४.०६ टक्के) आणि मूग ५,५४४ हेक्टर (१.०३ टक्के) क्षेत्रावर घेण्यात आला आहे.

मात्र पावसातील मोठ्या खंडामुळे या पिकांना आवश्यक त्या टप्प्यावर पाणी मिळाले नाही. परिणामी अनेक भागांतील पिकांची वाढ खुंटली असून मोठ्या प्रमाणावर पिके करपून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

९० दिवसांहून अधिक पर्जन्यखंड

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात विविध कालावधीत मोठे पर्जन्यखंड पडले. निवेदनानुसार जूनमध्ये २२ दिवस, जुलैमध्ये १२ दिवस, ऑगस्टमध्ये २५ ते ३० दिवस आणि सप्टेंबरमध्ये १९ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ९० दिवसांहून अधिक काळ पर्जन्यखंडाची स्थिती निर्माण झाली.

पावसाच्या या अनियमिततेचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला असून सोयाबीनसह तूर, उडीद आणि मूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकरी करपलेली सोयाबीनची पिके काढून ती जनावरांसाठी चारा म्हणून वापरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा

धाराशिव जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु मिळून एकूण २२५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकत्रित पाणी साठवण क्षमता ७२५.४० दशलक्ष घनमीटर आहे. मात्र पावसाळा संपत असतानाही प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

पाणीसाठा अत्यल्प असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि पशुधनासाठीही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भूजल पातळीतही मोठी घट

जिल्ह्यातील भूजल पातळीमध्येही मोठी घट झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी ९.५३ मीटर असल्याचे सांगण्यात आले असून, मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ती ७.०२ मीटरने खालावल्याचा दावा करण्यात आला आहे.

भूजल पातळी घटल्यामुळे फळबागा आणि ऊस पिकांवरही परिणाम होत असून पाण्याअभावी वाळलेल्या फळबागा व ऊस पिकांचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांनाही मदत देण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.

चारा छावण्या आणि टँकरची गरज

धाराशिव जिल्हा सातत्याने अवर्षण आणि दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरा जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचेही संकट निर्माण होते. यंदाची परिस्थिती पाहता आगामी काळात अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागू शकते.

तसेच पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करणे, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दुष्काळी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने संपूर्ण जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. त्यासोबतच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देऊन पिकांच्या नुकसानीची मदत, पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी, दुष्काळी सवलती आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

पावसातील मोठे खंड, करपलेली खरीप पिके, घटलेली भूजल पातळी आणि प्रकल्पांतील अत्यल्प पाणीसाठा या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!