आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, शेतीतील नापिकी आणि परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याची माहिती; कुटुंबीयांचे केले सांत्वन
यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी :
परंडा तालुक्यातील खासापुरी येथील २८ वर्षीय स्व. प्रथमेश दिलीप देशमुख या तरुणाने पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करत असताना आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेशच्या अकाली निधनाने खासापुरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी खासापुरी येथे प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत प्रथमेशच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

प्रथमेश हा अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन पुणे येथे MPSC परीक्षेची तयारी करत होता. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कर्जाचे ओझे, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसमोरील निर्माण झालेले संकट, सततची नापिकी तसेच स्पर्धा परीक्षेत दोन वेळा आलेले अपयश अशा विविध कारणांमुळे तो नैराश्यात गेला असल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीतून त्याने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले.
प्रथमेशच्या निधनाने देशमुख कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. प्रथमेश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात विधवा आई आणि चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुण मुलाच्या अचानक जाण्याने आई आणि बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. प्रथमेशसारख्या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे ही कौतुकाची बाब होती; मात्र त्याच्या मृत्यूची घटना अत्यंत क्लेशदायी आणि दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे आणि अडचणीच्या काळात कुटुंबीय, मित्र तसेच समाजातील व्यक्तींशी संवाद साधणे गरजेचे असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अरविंद (बप्पा) रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सारंग घोगरे, रामदास गुडे, किरण देशमुख, साहेबराव पाडुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रथमेशच्या निधनाने एका कुटुंबाचा आधार हरपला असून, अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन संघर्ष करणाऱ्या या तरुणाचा दुर्दैवी अंत परिसरातील नागरिकांसाठीही चटका लावणारा ठरला आहे.
