तीन आरोपी जेरबंद, तिघे पसार; आयशर टेम्पो, इर्टिगा कार, सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमालासह २४ लाखांचा ऐवज हस्तगत
यशश्री अपडेट्स|धाराशिव |
हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आयशर टेम्पोचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी अंबेजवळगा शिवारातून तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत आयशर टेम्पो, इर्टिगा कार, सोन्याचे दागिने तसेच अन्य मुद्देमाल असा एकूण २४ लाख ८ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या टोळीतील अन्य तीन आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांचा सापळा
जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियमितपणे पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, रविवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी पहाटे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
एक आयशर टेम्पो दरोडा टाकण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन परिसरात फिरत असून टोळी हायवेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाईची सूत्रे हलविली.
सोनेगाव रस्त्यावर पोलिसांचा सापळा
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. पहाटे सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास संशयास्पद आयशर टेम्पो भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसला.
पोलिसांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून चालकाने थेट पोलिसांच्या दिशेने आयशर टेम्पो आणल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला होत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर आरोपींचा आयशर टेम्पो घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न सुरू झाला.
थरारक पाठलागानंतर तिघे जेरबंद
आरोपींचा पाठलाग करत पोलिसांचे पथक अंबेजवळगा शिवारात पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आयशर टेम्पोला अडवून त्यामधील तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
- आनंद उर्फ आकाश शामराव पवार (वय २७, रा. आळणी)
- बल्या उर्फ सोनू अशोक शिंदे (वय २३, रा. गोलेगाव, ता. भूम)
- शंकर गणा काळे (वय २४, रा. जयभवानीनगर, ढोकी)
दरम्यान, या टोळीतील अन्य तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
अनेक चोरी व लुटीच्या गुन्ह्यांची कबुली
ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी आणि लुटीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोलारच्या केबलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून जबरीने लुटल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.
२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून आयशर टेम्पो, इर्टिगा कार, सोन्याचे दागिने तसेच इतर चोरीचा व गुन्ह्यात वापरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २४ लाख ८ हजार ५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मुद्देमालासह धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यासह या टोळीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, केदार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड तसेच क्यूआरटी पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हायवेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वेळेत जेरबंद केल्याने मोठा गुन्हा टळल्याची चर्चा परिसरात सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.
