यशश्री अपडेट्स | धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे जिल्ह्यातील एकमेव विधानसभा आमदार राणाजगजीतसिंह पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांना स्थान देण्यात आले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना मात्र कार्यक्रमातील प्रमुख उपस्थितांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
पाटील विरुद्ध पाटील संघर्षाची पुन्हा चर्चा
धाराशिवच्या राजकारणात ‘पाटील विरुद्ध पाटील’ हा सत्ता केंद्राभोवतीचा संघर्ष नवीन नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही दोन्ही गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचे अनेकदा समोर आले होते. आता दोन्ही नेते भाजपमध्ये असले तरीही हा अंतर्गत संघर्ष संपलेला नसल्याची चर्चा या निमंत्रण पत्रिकेच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाच्या पत्रिकेवर राणाजगजीतसिंह पाटील आणि अर्चना पाटील यांची नावे अथवा छायाचित्र नसताना शिवसेना उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना मानाचे स्थान देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपचे आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा असूनही नावाचा अभाव
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे एकमेव विधानसभा आमदार आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण पत्रिकेत स्थान न मिळाल्याने राजकीय चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
दुसरीकडे, पत्रिकेवर भाजपचे काही प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची नावे व छायाचित्रे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक करण्यात आलेली राजकीय डावपेचाची खेळी, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
मागील महिन्यात जिल्ह्यात ‘जुना भाजप विरुद्ध नवीन भाजप’ असा वाद चर्चेत आला होता. त्यानंतर आता आरोग्य शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत मतभेदांची ठिणगी पुन्हा पडल्याचे बोलले जात आहे.
स्वामींची भाजप व पाटील कुटुंबाशी वाढती जवळीक?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांची पाटील कुटुंबीय तसेच भाजपमधील काही नेत्यांशी गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली जवळीकही या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली आहे. निमंत्रण पत्रिकेवर त्यांना देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण स्थानामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
आज मुरूम येथे मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर
उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन आज, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना परिसरात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील राहणार आहेत. आरोग्य व महिला विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षचे प्रमुख रामेश्वर नाईक, मुरूमचे नगराध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, डॉ. स्वानंद सोनार तसेच शरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, एका आरोग्य शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेवरून धाराशिव जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
