ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त परंड्यात उत्साहपूर्ण जुलूस; पठाण परिवाराकडून बालकांसह नागरिकांना अल्पोपहार, मिठाई व पाण्याचे वाटप

यशश्री अपडेट्स | परंडा :
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त परंडा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालक सहभागी झाले होते. जुलूसच्या निमित्ताने शहरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

जुलूसमध्ये सहभागी झालेल्या बालकांसह नागरिकांसाठी नगरसेवक अकिब पठाण आणि पठाण परिवाराच्या वतीने मंडई चौक येथे विशेष स्वागत व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जुलूस मंडई चौक परिसरात आल्यानंतर सहभागी नागरिकांना अल्पोपहार, मिठाई तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. परंडा शहराची सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची परंपरा कायम राहावी, तसेच विविध समाजघटकांनी परस्परांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होत सामाजिक सलोखा अधिक दृढ करावा, असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष खलीलखान पठाण, माजी नगरसेवक ॲड. नुरुद्दीन चौधरी, माजी नगरसेवक शब्बीरखान पठाण, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रमेशसिंह परदेशी, भाजयुमो शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच नगरसेवक सत्तारखान पठाण, नगरसेवक मदनसिंह सद्दीवाल, नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, नगरसेवक मजहर दहेलूस, नगरसेवक इस्माईल कुरेशी यांच्यासह माजी नगराध्यक्ष बाशाभाई शहाबर्फीवाले, ॲड. सलमान तांबोळी, जोयब हावरे, फारूखान पठाण, सिद्दीक हन्नूरे, अजिमभाई हन्नूरे, अरबाजखान पठाण, रियाजखान पठाण, सरवरखान पठाण, बुरानोद्दीन पठाण, हारूणखान पठाण, समदखान पठाण, दिलावरखान पठाण आदी उपस्थित होते.

सामाजिक सलोख्याचा संदेश

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये बालकांचा मोठा सहभाग असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते. जुलूसदरम्यान सहभागी नागरिकांना विविध ठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंडई चौकात पठाण परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना दिलासा मिळाला.

परंडा शहरात विविध धर्मीय नागरिक अनेक वर्षांपासून एकोप्याने सण-उत्सव साजरे करत आले आहेत. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातूनही सामाजिक बंधुभाव, परस्पर सन्मान आणि एकतेचा संदेश अधोरेखित झाला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात एकत्र उपस्थित राहिल्याने सामाजिक सलोख्याचे चित्र पाहायला मिळाले.

नगरसेवक अकिब पठाण आणि पठाण परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या अल्पोपहार, मिठाई आणि पाणीवाटपाच्या उपक्रमाचे जुलूसमध्ये सहभागी नागरिकांनी कौतुक केले. उत्साहपूर्ण वातावरणात जुलूस पार पडत असताना उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा देत परंडा शहरातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाची परंपरा अधिक दृढ होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!