परंड्यात आर्थिक व्यवहारातून दोन गटांत राडा; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंडई पेठ चौकात लोखंडी पाइप, दांड्यांसह हाणामारी; दुकाने बंद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यशश्री अपडेट्स | परंडा

परंडा : जुन्या पैशांच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वाद विकोपाला जाऊन परंडा शहरातील मंडई पेठ चौकात दोन गट आमनेसामने भिडल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या, लोखंडी पाइप तसेच दगडांचा वापर करण्यात आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे भीतीपोटी आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांचीही मोठी धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या आर्थिक व्यवहारावरून दोन गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री मंडई पेठ चौकात दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची काही वेळातच आक्रमक झाली आणि दोन्ही बाजूंकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. या झटापटीत लोखंडी पाइप, दांडे, लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती गंभीर बनली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस उपनिरीक्षक खरत, पोलीस उपनिरीक्षक बाराते, पोलीस उपनिरीक्षक गजानन मुंढे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पांगविले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला.

२३ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पोलीस नाईक भुजंग सुखदेव आडसुळ यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसीम पठाण, शफी पठाण, हैदर शेख, नदीम पठाण, आरबाज पठाण, फिरोज पठाण, आसिफ शेख, वजीर शेख, अजहर शेख, जावेद शेख, राजू शेख, लतीफ शेख, गौस शेख, मुस्तफा मुजावर, सरवर पठाण, मुशीन पठाण, बाबा पठाण, वसीम पठाण, फयाज पठाण, जाबाज ऊर्फ शाहाबाज पठाण, बबलू पठाण, इरफान पठाण व मुज्जू पठाण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

नागरिकांमध्ये भीती; दुकाने बंद

मंडई पेठ हा शहरातील वर्दळीचा परिसर असल्याने रात्रीच्या वेळी झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या राड्यामुळे परिसरातील दुकानदारांनी खबरदारी म्हणून आपली दुकाने बंद केली. रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर परिसरात शांतता प्रस्थापित झाली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हाणामारी करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

काही आरोपींची पोलिसांकडे धाव

दरम्यान, दाखल गुन्ह्यातील २३ आरोपींपैकी काही व्यक्तींनी शनिवारी परंडा पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होऊन आपण घटनास्थळी उपस्थित नसतानाही आरोपी करण्यात आल्याची खंत संबंधित अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून घटनेच्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे जबाब तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात येणार आहे. तपासादरम्यान घटनेत सहभागी नसल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी जबाबाच्या आधारे संबंधितांची नावे वगळण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

१५ दिवसांत दुसरी मोठी घटना

परंडा शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी दोन गटांमध्ये हाणामारी होण्याची ही अलिकडच्या काळातील दुसरी मोठी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी परंडा-सोनारी मार्गावरील बावची चौकात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता. त्या घटनेतही भररस्त्यात दगडफेक आणि लाकडाने मारहाण झाल्याचे समोर आले होते.

अल्पावधीत सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आर्थिक किंवा वैयक्तिक वाद रस्त्यावर येण्यापूर्वीच संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वनाथ शिंदे करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात असून, दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!