१० लाख वृक्षलागवडीद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लक्ष्य; ‘हरित धाराशिव २.०’साठी सर्वांच्या सहभागाचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन

यशश्री अपडेट्स | धाराशिव

पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित धाराशिव २.०’ अभियानाला जिल्ह्यात व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. या अभियानाअंतर्गत १४ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील ३३ हेक्टर क्षेत्रात अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात शासकीय यंत्रणा, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, ही मोहीम लोकचळवळ बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची चाचणी करण्यासाठी आळणी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत रंगीत तालीम आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वन अधिकारी (प्रा.) जी. एन. येडलावार तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वनक्षेत्र वाढविणे ही काळाची गरज

जिल्हाधिकारी श्री. पुजार म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याचे वनक्षेत्र तुलनेने कमी असल्याने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि त्यांचे दीर्घकालीन संगोपन करणे अत्यावश्यक आहे. गतवर्षी जिल्ह्यात १५ लाख वृक्षांची लागवड करून उल्लेखनीय यश मिळाले होते. त्या अनुभवाच्या बळावर यंदा एकाच दिवशी १० लाख वृक्षांची लागवड करून जागतिक विक्रम नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार संपूर्ण प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून वनस्पती शास्त्रज्ञ आणि अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीची प्रत्येक प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीने आणि वेळेच्या अचूक नियोजनासह पार पाडली जाणार आहे.

वृक्षलागवडीसोबत संगोपनालाही तितकेच महत्त्व

जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी स्पष्ट केले की, केवळ विक्रम नोंदविणे हा या मोहिमेचा उद्देश नाही. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८६ टक्के झाडे आजही जिवंत असल्याचा उल्लेख करत त्यांनी विविध विभागांच्या समन्वय आणि परिश्रमांचे कौतुक केले. यंदाच्या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ४० शासकीय रोपवाटिकांमध्ये आवश्यक रोपे तयार करण्यात आली असून, राज्य शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड अभियानात धाराशिवचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर म्हणाल्या की, १० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट हे जिल्ह्यासाठी मोठे आव्हान असले तरी सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास हा विक्रम निश्चितच प्रस्थापित होईल. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि नागरिकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास १४ ऑगस्टचा दिवस धाराशिवच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीप्रमाणे काटेकोर नियोजन

उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी मोहिमेच्या तांत्रिक बाबींची माहिती देताना सांगितले की, ही वृक्षलागवड सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग आणि येडशी अभयारण्याच्या क्षेत्रातील शासकीय जमिनीवर करण्यात येणार आहे. लागवडीच्या ठिकाणी रेषांकन स्पष्ट दिसावे यासाठी दहा आर क्षेत्रासाठी सुमारे १५० किलो चुन्याचा वापर करून रेषांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले की, या मोहिमेत डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. प्रत्येक लागवडीची नोंद क्यूआर कोड प्रणालीद्वारे मोबाईलवर स्कॅन करून केली जाईल. गिनीज रेकॉर्डच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि पुरावे डिजिटल स्वरूपात संकलित केले जाणार आहेत. तसेच ८ ऑगस्ट रोजी वनस्पती शास्त्रज्ञांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये लागवडीच्या वैज्ञानिक निकषांवर चर्चा होणार आहे.

प्रात्यक्षिकातून तयारीची चाचणी

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर आणि विभागीय वन अधिकारी जी. एन. येडलावार यांच्या हस्ते वृक्षलागवड करून मोहिमेच्या प्रात्यक्षिकाला प्रारंभ करण्यात आला. रंगीत तालीमेद्वारे स्वयंसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लागवड प्रक्रिया, वेळेचे नियोजन, रोपे हाताळण्याची पद्धत, नोंदणी प्रक्रिया आणि समन्वय यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

सर्वांच्या सहभागातून हरित धाराशिव

या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, गणेश शिंदे, तहसीलदार मृणाल जाधव, अरविंद बोलंगे, प्रकाश म्हेत्रे, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी शेवटी आवाहन करताना सांगितले की, ‘हरित धाराशिव २.०’ हे केवळ प्रशासनाचे अभियान नसून संपूर्ण जिल्ह्याचे अभियान आहे. पर्यावरण संरक्षणाच्या सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन धाराशिवला हरित जिल्हा बनविण्यास हातभार लावावा. १४ ऑगस्ट रोजी होणारी ही ऐतिहासिक वृक्षलागवड मोहीम जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!