यशश्री अपडेट्स | धाराशिव
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून डीजे व डॉल्बीचा वापर करणाऱ्यांविरोधात धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत अनेक डीजे संच, ध्वनीक्षेपक साहित्य आणि वाहने जप्त करण्यात आली असून जप्त साहित्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या आयोजक आणि डीजे चालकांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, भविष्यात अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
कारवाईदरम्यान वास्तव ग्रुपचे आयोजक बापू धर्मा चव्हाण, लहुजी शक्ती सेनेचे आयोजक लखन उमेश क्षीरसागर (एम.डी. ग्रुप), रॉबिन बगाडे मित्रपरिवाराचे आयोजक पोपट पुंडलिक बगाडे, तसेच क्रांतिवीर फकीरा सामाजिक संघटनेचे आयोजक सम्यक कुंदन चिलवंत यांच्यासह संबंधित डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच आजाद डीजे साऊंड सिस्टिमचे मालक प्रमोद शिवाजी काकडे (रा. तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे), बकासुर डीजेचे मालक रविकांत उमाकांत तोरणे (रा. इंदापूर, जि. पुणे), एस.आर. डॉल्बीचे मालक शंकर गजानन पत्रवाळे (रा. रिसोड, जि. वाशिम) आणि रुबाब डीजेचे मालक वैभव विक्रम जाधव (रा. घाट पिंपरी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्यावरही नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संबंधित डीजे वाहने आणि ध्वनीक्षेपक साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ होमकर, कासूळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे, अक्षय डिगोळे, पोलीस कर्मचारी तलवारे तसेच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
धाराशिव पोलिसांनी गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालक आणि आयोजकांवर सातत्याने दंडात्मक व न्यायालयीन कारवाई केली आहे. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने संबंधितांवर लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तरीही काही आयोजक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने यावेळी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेत थेट डीजे संच आणि वाहने जप्त करण्याची कारवाई केली.
धाराशिव पोलिसांकडून शांतता कमिटीच्या बैठकीत वारंवार नागरिक, मंडळे आणि आयोजकांना पारंपरिक वाद्यांचा वापर करून जयंती, उत्सव आणि मिरवणुका साजऱ्या करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय तसेच शासनाच्या नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांचे आवाहन
यापुढील काळात डॉल्बी आणि नियमबाह्य डीजेचा वापर टाळावा. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून जयंती, धार्मिक व सामाजिक उत्सव साजरे करून सामाजिक सलोखा आणि कायद्याचा सन्मान राखावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा धाराशिव पोलिसांनी दिला आहे.
