यशश्री अपडेट्स | धाराशिव :
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने कर्जमाफी, थकीत वीजबिल माफी आणि पिकविमा या तीन महत्त्वाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून, पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, या शेतकऱ्यांना सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या कर्जमाफी, वीजबिल माफी आणि पिकविमा योजनांबाबत माहिती देण्यासाठी प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीन काळे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निहाल काझी, संजय लोखंडे, प्रदीप शिंदे, संजय पाटील खामसवाडीकर आदी उपस्थित होते.

जुलैअखेरपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात
जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने सर्व लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. तसेच पुढील टप्प्यात जिल्ह्यातील आणखी 30 हजार शेतकऱ्यांचा समावेश होणार असून, एकूण 76 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
1.64 लाख शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा लाभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीची ₹50 हजारांची मर्यादा हटवून त्यांनाही ₹2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 7.50 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांवरील ₹48 हजार कोटींचे थकीत वीजबिल आणि व्याज माफ करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, सुमारे ₹2,800 कोटींची वीजबिल थकबाकी माफ होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
पिकविम्याचा मोठा दिलासा
खरीप 2025 हंगामातील पिकविमा रक्कम वितरणालाही गती देण्यात आली असून, या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ₹350 कोटींच्या पिकविमा रकमेचा लाभ मिळणार असून, सोमवारपासून थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय, तांत्रिक कारणांमुळे वगळण्यात आलेल्या 14 मंडळांतील शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध
कर्जमाफी, वीजबिल माफी आणि पिकविमा या तिन्ही माध्यमांतून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा महायुती सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
