यशश्री अपडेट्स | धाराशिव: कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात “कारगिल विजय दिन” अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या हस्ते कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी बोलताना सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रभाकर चौगुले यांनी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाविषयी सविस्तर माहिती दिली. कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांनी उपस्थितांना राष्ट्रप्रेम आणि देशसेवेची प्रेरणा दिली.

या कार्यक्रमास अतिरिक्त उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्ञानराज पौळ यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, खातेप्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले होते. उपस्थितांनी शहीद जवानांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे वृत्त संकलन व संपादन माहिती व प्रसिद्धी कक्षाचे जनसंपर्क अधिकारी पद्माकर कुलकर्णी यांनी केले.
