यशश्री अपडेट्स | धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बहुप्रतीक्षित केंद्रीय विद्यालयाची (Kendriya Vidyalaya) सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (KVS) उच्चस्तरीय पथकाने गुरुवारी धाराशिव शहरात येऊन तात्पुरत्या व कायमस्वरूपी जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सकारात्मक घडामोडीबरोबरच महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना या दोन घटक पक्षांमध्ये विद्यालयाच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चुरसही रंगताना दिसत आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेचे सहाय्यक आयुक्त ए. सी. पाटील, मानखुर्द येथील केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य पवन खंडाल आणि सोलापूर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य उमाकांत जोशी यांचा समावेश असलेल्या तांत्रिक व प्रशासकीय पथकाने धाराशिव शहरातील प्रस्तावित जागांची पाहणी केली. या वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तात्पुरत्या इमारतीचा प्रस्ताव
केंद्रीय विद्यालयाची स्वतंत्र इमारत उभी राहण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या इमारतीचा प्रस्ताव पथकासमोर ठेवला. जिल्हा परिषदेच्या ‘डायट’ कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कन्या शाळेची इमारत यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
या इमारतीत सुमारे २५ प्रशस्त वर्गखोल्या, स्वतंत्र ग्रंथालय, सुसज्ज सभागृह, प्रशासकीय कार्यालयासाठी आवश्यक जागा तसेच सुमारे तीन एकर मोकळी जागा उपलब्ध असल्याने पथकाने समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विद्यालयाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचीही यावेळी पाहणी करण्यात आली.
कायमस्वरूपी इमारतीसाठी ५ एकर जागा प्रस्तावित
केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीसाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसाहतीमागील गट क्रमांक ४२६ मधील पाच एकर शासकीय जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेचीही केंद्रीय पथकाने पाहणी केली.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने केंद्रीय विद्यालय संघटनेकडे अधिकृत प्रस्ताव पाठविला असून, आवश्यक कागदपत्रे आणि जागेचा तपशीलही सादर करण्यात आला आहे. जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ठरणार मोठी संधी
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यास केंद्र सरकारच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, क्रीडा सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वातावरण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. विशेषतः केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
सध्या धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय नसल्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सोलापूर, लातूर किंवा इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या विद्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती.
महायुतीत श्रेयासाठी स्पर्धा


केंद्रीय विद्यालयाच्या प्रक्रियेला वेग मिळताच महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेत श्रेय घेण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पथकासोबत बैठक घेऊन तात्पुरत्या इमारतीचा प्रस्ताव सादर केला आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी आपण गेल्या वर्षभरापासून सातत्याने केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत असल्याचा दावा केला.
दुसरीकडे, शिंदेसेनेचे सोमनाथ गुरव, अमित उंबरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही केंद्रीय पथकाची भेट घेऊन विद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. त्यामुळे विद्यालयाच्या प्रस्तावावरून दोन्ही पक्षांकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अंतिम निर्णयाकडे लक्ष
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता त्यांचा अहवाल केंद्रीय विद्यालय संघटनेकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यास धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू होणे ही विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी शैक्षणिक उपलब्धी ठरणार असून, आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
