यशश्री अपडेट्स | उमरगा :
धाराशिव जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना उमरगा तालुक्यात आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि बाळंतपणात तिने एका मुलीला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात तिचा पती, आई-वडील तसेच संबंधित नातेवाईकांविरुद्ध पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या १८ वर्षे ५ महिन्यांची असून विवाहाच्या वेळी ती केवळ १७ वर्षांची अल्पवयीन होती. तिचे अल्पवयीन वय माहीत असतानाही १४ मे २०२५ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह एका तरुणाशी लावून दिल्याचा आरोप आहे.
लग्नानंतर पतीने अल्पवयीन असलेल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गर्भवती राहिली. नुकत्याच झालेल्या प्रसूतीमध्ये तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला. वैद्यकीय उपचारादरम्यान तिच्या वयाबाबतची माहिती समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर पीडितेने २४ जुलै २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दाखल केली. पीडितेची ओळख आणि गाव कायदेशीर कारणांमुळे गोपनीय ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा पती, आई-वडील आणि संबंधित नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२), ६४(२)(एम), ३(५), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १०, ११ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ च्या कलम ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात वारंवार समोर येणाऱ्या बालविवाहाच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
उमरगा तालुक्यात पुन्हा बालविवाहाचा धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीच्या बाळंतपणानंतर पतीसह आई-वडिलांवर पोक्सोअंतर्गत गुन्हायशश्री
