* उपवर्गीकरणापेक्षा खाजगीकरणाचा धोका मोठा; बहुजन समाजाने मनुवादी कट ओळखावा: विजयकुमार बनसोडे यांचा इशारा
* परंडा तालुक्यातून हजारो बौद्ध व मागासवर्गीय बांधव धाराशिवकडे धडकणार
यशश्री अपडेट्स |परंडा (प्रतिनिधी ): अनुसूचित जाती (SC) समूहाच्या आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करून बहुजन समाजात फूट पाडण्याच्या राजकीय डावाविरोधात २८ जुलै रोजी धाराशिव जिल्हा मुख्यालायावर धडकणाऱ्या ‘भव्य आरक्षण विरोधी मोर्चा’च्या यशस्वीतेसाठी परंडा शहरात मंगळवारी (दि. २१) बहुजन चळवळीतील सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांची एक निर्णायक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत परंडा तालुक्यातून हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी होऊन महामोर्चा यशस्वी करण्याचा वज्रनिर्धार केला.
‘पुतनामावशीचे प्रेम’ ओळखा, मुख्य लढ्यापासून भरकटू नका!
या बैठकीत सद्य सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विजयकुमार बनसोडे यांनी अत्यंत रोखठोक आणि वैचारिक भूमिका मांडली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले:
“आज आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे तुकडे करून उपवर्गीकरण करण्यापेक्षा शासकीय क्षेत्रातील बेसुमार खाजगीकरण रोखणे हीच चळवळीची सर्वात मोठी गरज आहे. महार, मातंग आणि इतर सर्वच शोषित समाजातील तरुणांना उद्योगधंद्यासाठी महामंडळांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, एकूण आरक्षणाची टक्केवारी वाढवणे आणि सरकारी शिक्षण व्यवस्था व शाळांना सवलती व कायदेशीर संरक्षण देणे हे मुख्य प्रश्न आहेत.
असे असताना मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करून समाज भलतीकडेच भरकटत जाण्यात काहीही अर्थ नाही. मातंग बांधवांनी अत्यंत शांततेने, संयमाने आणि वैचारिक परिपक्वतेने परिस्थिती समजून घेतली पाहिजे. मनुवाद्यांचे हे केवळ ‘पुतनामावशीचे प्रेम’ असून बहुजन समाजात दुही माजवून एकमेकांचे माथे भडकवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. हा मनुवादी कट वेळीच ओळखा, अन्यथा आगामी काळात संपूर्ण मागासवर्गीय समाजाचे मोठे नुकसान होईल.”
चळवळीतील प्रमुख नेत्यांची एकमुखी उपस्थिती
या बैठकीस परंडा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे आणि आंबेडकरवादी चळवळीतील सर्वच प्रमुख शिलेदार एकाच मंचावर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती:
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई): प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, तालुका अध्यक्ष दादा सरवदे, सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, निळू बनसोडे.
- सामाजिक व शैक्षणिक संस्था: भारतीय बुद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाविहार समितीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे, भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नकांत शिंदे.
- राजकीय व सामाजिक प्रतिनिधी: राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे, परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, दयानंद बनसोडे, फकीर सुरवसे.
याशिवाय धनंजय सोनटक्के, संजीवन भोसले, जयराम साळवे, भास्कर ओव्हाळ, बापू हावळे, उत्तम ओव्हाळ, दीपक ठोसर, विकास गोमासे, हरिभाऊ आढळे, रामा ओव्हाळ, दादा बगाडे, प्रीतम ओव्हाळ, राम वाघचौरे, शाम गायकवाड, बाळू चतुर, दीपक गायकवाड, अनिल शिंदे, खंडू चाबुकस्वार, विश्वास लोकरे, श्रावण गणगे, भारत धेंडे, किशोर वाघचौरे, दादा वडतीले, ॲड. दयानंद धेंडे, विजय रणदील, चंद्रपाल पालके, उमेश सोनवणे, नाना गोमासे, सचिन राऊत, अशोक खरात, बाबा गायकवाड, कानीफ सरपणे, बालाजी यशवद, तानाजी गोडखे यांसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
गावागावांत कोपरा बैठका; परंड्यातून मोठा जनसमुदाय धडकणार
२८ जुलै रोजी होणारा धाराशिव येथील मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी परंडा तालुक्यातील प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात जनजागृती कोपरा बैठका घेण्याचे या बैठकीत ठरले. आरक्षणावरील गदा रोखण्यासाठी आणि समाजाची ताकद प्रशासनाला दाखवून देण्यासाठी परंडा तालुक्यातून हजारोचा जनसमुदाय गाड्यांच्या ताफ्यासह धाराशिवकडे रवाना होणार असल्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला.
