यशाची दोन रूपं! कात्राबादचे ‘आदित्य’—एक टॉपर, दुसरा जिद्दीचा विजेता

यशश्री अपडेट्स – परंडा :

परांडा तालुक्यातील कात्राबादचे दोन ‘आदित्य’ चमकले !

एकाने गाठलं शंभर नंबरी शिखर; दुसरा ‘काठोकाठ’ पास

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यात परंडा तालुक्यातील कात्राबाद येथील दोन सुपुत्रांनी मिळवलेल्या निकालाची सध्या जिल्हाभरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही विद्यार्थ्यांचे नाव ‘आदित्य’ असून, एकाने 100 टक्के गुण मिळवून गगनभरारी घेतली आहे, तर दुसऱ्याने 35 टक्के गुण मिळवून ‘काठोकाठ’ उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे.

शंभर नंबरी आदित्य !

कात्राबादचा भूमिपुत्र आदित्य अविनाश गरड याने लातूर येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयातून परीक्षा दिली होती. त्याने आपल्या अभ्यासातील सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर 100 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशाने कात्राबादच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आदर्श विद्यार्थी म्हणून त्याचे नाव घेतले जात आहे.

जिद्दी आदित्यची ‘काठोकाठ’ बाजी

दुसरीकडे, याच गावातील आदित्य भैरवनाथ बोराडे याने परंडा येथील कै. महारुद्र बप्पा मोटे विद्यालयातून शिक्षण घेताना 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची किमया साधली. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे नेमके गुण मिळवून त्याने आपली जिद्द सिद्ध केली. बोर्डाच्या परीक्षेत पास होणे महत्त्वाचे, हाच आनंद त्याच्या निकालातून दिसून येत आहे.

गावात आनंदाचे वातावरण

एकाच गावच्या दोन मुलांनी निकालाचे दोन टोकाचे, परंतु तितकेच महत्त्वाचे टप्पे गाठल्याने कात्राबाद ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एक गुणवत्ता यादीत चमकला तर दुसऱ्याने उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक वाटचाल कायम ठेवली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दोन्ही ‘आदित्य’च्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *