बार्शीत हृदयद्रावक घटना: मायग्रेनच्या झटक्यात आईकडून १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात हजेरी

  • दुसऱ्या ६ वर्षांच्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न; चिमुरडीच्या विनवणीमुळे ती बचावली
  • बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी माता पोलिसांच्या ताब्यात

यशश्री अपडेट्स |बार्शी: लाडक्या लेकरांना मायेची सावली देणाऱ्या जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलींवर काळा झडप घातल्याची एक थरारक आणि मन सुन्न करणारी घटना बार्शी शहरात घडली आहे. तीव्र मायग्रेनच्या (अर्धशिशी) आजाराच्या झटक्यात एका महिलेने आपल्या अवघ्या १० महिन्यांच्या चिमुरडीचा गळा दाबून आणि पाण्यात बुडवून खून केला. एवढेच नव्हे, तर या नराधम मातेने आपल्या ६ वर्षांच्या दुसऱ्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ती स्वतः मृत मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात हजर झाली. रविवार (दि. १९) रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास बार्शीतील अलिपूर रोड परिसरात ही घटना घडली असून, यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी आईविरुद्ध खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा योगेश खुर्दामळे (वय अंदाजे वर्षे, मूळ रा. शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड; सध्या रा. शंभूराजे चौक, अलिपूर रोड, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

चिमुरडीचा गळा दाबून बादलीत बुडवले

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा खुर्दामळे ही महिला तीव्र मायग्रेनच्या आजाराने ग्रस्त आहे. रविवारी सकाळी ती आपल्या घरी असताना तिला मायग्रेनचा तीव्र झटका आला. या मानसिक अन् शारीरिक त्रासातून तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने घरात खेळत असलेल्या तिची अवघ्या १० महिन्यांची लहान मुलगी शक्ती योगेश खुर्दामळे हिचा निर्घृणपणे गळा दाबला. शक्तीचा जीव गेल्यानंतरही तिने तिला बाथरुममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत बुडवून तिची खात्री केली.

“आई मला मारू नको, मला शिकायचंय…” ६ वर्षांची तेजल बचावली

लहान मुलीचा जीव घेतल्यानंतर पूजा खुर्दामळे हिने तिची ६ वर्षांची मोठी मुलगी तेजल हिच्याकडे मोर्चा वळवला. तिने तेजलचे तोंड उशीने दाबून तिलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या थरारात ६ वर्षांच्या चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचला. उशीखाली गुदमरणाऱ्या तेजलने आईला कळवळून विनवणी केली, “आई, मला मारू नकोस, मला खूप चांगले शिकायचे आहे…” आपल्या निष्पाप लेकीचे हे आर्त शब्द ऐकून आईच्या हातातील उशी बाजूला झाली आणि तेजल थोडक्यात बचावली.

मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात एन्ट्री!

यानंतर जे घडले ते पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. दोन्ही मुलींवर हल्ला केल्यानंतर पूजाने १० महिन्यांच्या मृत शक्तीला आपल्या खांद्यावर घेतले आणि ती थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पायी चालत दाखल झाली. पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदार शबाना कोतवाल यांच्यासमोर जात ती म्हणाली,

“मी माझ्या लहान मुलीचा गळा दाबून आणि बादलीत बुडवून खून केला आहे. मला तातडीने अटक करा आणि मला गोळ्या घालून मारून टाका!”

हा प्रकार ऐकून पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड हादरले. महिला पोलिसांनी तत्काळ त्या मृत चिमुरडीला ताब्यात घेतले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेचे गांभीर्य ओळखून बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुहास जगताप आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी तातडीने अलिपूर रोड येथील घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरून आवश्यक ते पुरावे संकलित केले आहेत. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

संबंधित महिलेने मायग्रेनच्या असह्य आजारातून आणि मानसिक विकाराच्या भरात हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील धनवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेमुळे बार्शी शहरावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!