सोलापूरच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी खासदार प्रणिती शिंदे आक्रमक; जिल्हा नियोजन बैठकीत मागण्यांचा धडाका!

यशश्री अपडेट्स |सोलापूर

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, तसेच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोलापूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘जिल्हा नियोजन समिती’च्या (DPDC) आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध महत्त्वाच्या विषयांवर धारेवर धरत ठोस मागण्या मांडल्या.

विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून जिल्ह्यातील विकासकामे, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, वीजपुरवठा, आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांबाबत त्यांनी सखोल आढावा घेतला. रखडलेल्या कामांवरून अधिकाऱ्यांची कोंडी करत, जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

◼️ शेतकऱ्यांसाठी वीज आणि पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी

बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रामुख्याने शेती आणि सिंचनाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या:

  • ८ तास थ्री-फेज वीज: भीमा नदीकाठावरील शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसाच्या वेळेत किमान सलग आठ तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू करावा, जेणेकरून शेतकऱ्यांची रात्रीची फरफट थांबेल. ग्रामीण भागात सिंगल फेज वीजपुरवठा २४ तास सुरळीत ठेवावा.
  • पाण्याचे आवर्तन: उजनी धरणातून सीना नदी व बोगद्यास आवश्यक पाणी तातडीने सोडावे. तसेच वीर-भाटघर धरणातून निरा उजवा कालव्याद्वारे खरिपासाठी पाण्याचे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे.
  • म्हैसाळ योजना: म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.

◼️ सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि खतांची कृत्रिम टंचाई रोखा

शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीवर बोट ठेवत त्यांनी कृषी विभागाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला:

  • सरसकट कर्जमाफी: शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करावी. तसेच कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची बँक खाती ‘होल्ड’वर ठेवल्यामुळे अडकलेली रक्कम तातडीने मोकळी करावी.
  • बियाणे व खत पुरवठा: मोफत बी-बियाणे योजनेतील लॉटरी पद्धत बंद करून ऑनलाइन नोंदणी केलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला बियाणे द्यावे. याशिवाय DAP आणि युरिया खतांच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांवर इतर उत्पादनांची सक्ती (लिंकिंग) करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि भेसळयुक्त खते विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सोयाबीन उत्पादकांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा.

◼️ घरकुल योजना आणि सामाजिक योजनांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी

  • घरकुल अनुदान वाढवा: घरकुल योजनेसाठी गावठाण जागा उपलब्ध नसल्यास गायरान जमिनीवर मंजुरी द्यावी. तसेच महागाई लक्षात घेता घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान १.५ लाखांवरून २ लाख रुपये करावे आणि लाभार्थ्यांना सुरुवातीपासूनच मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी.
  • दाखल्यांची अट रद्द करा: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची क्लिष्ट अट रद्द करून पूर्वीप्रमाणे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे.

◼️ शहरातील रखडलेले उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधा

सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांवर बोलताना त्यांनी संथ गतीने सुरू असलेल्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली:

  • शहरातील अतिशय वर्दळीच्या मरीआई चौक रेल्वे उड्डाणपूल आणि आसरा चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. प्रशासनाने या कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होईल.
  • सोलापूर शहरात आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करण्यात याव्यात.

प्रशासनाला स्पष्ट इशारा: “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता, सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजाला केंद्रबिंदू ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रलंबित विकासकामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी या बैठकीत दिला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार शिंदे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासन या मागण्यांवर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!