राहुल मोटे यांचा पुढाकार : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश!

बाणगंगा साखर कारखान्याकडून २,८०० रुपये प्रतिटनप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा

यशश्री अपडेट्स | परंडा परंडा येथील बाणगंगा सहकारी साखर कारखाना (राजगंगा शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट्स एलएलपी) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल मोटे यांच्या सकारात्मक पुढाकारानंतर कारखाना प्रशासनाने १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन २,८०० रुपये दराने ऊसबिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. कारखाना प्रशासनाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांचा आक्रोश

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असतानाही, जानेवारी महिन्यापासून ते हंगाम अखेरपर्यंतची ऊसबिले न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली होती. मशागत, बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज होती. मात्र, कारखान्याने हक्काचे पैसे रखडवल्याचा आरोप करत गुरुवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडले होते. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता.

त्यावेळी प्रशासनाने २० जुलै २०२६ पर्यंत सर्व थकीत बिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

माजी आमदार राहुल मोटे यांची मध्यस्थी आणि तोडगा

शेतकऱ्यांची अडचण आणि आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल मोटे यांनी तातडीने राजगंगा शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट्स एलएलपीच्या वरिष्ठ प्रशासनासोबत चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी प्रलंबित ऊसबिलांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील बिले तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत.

ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांची देयकेही मिळणार

कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर ऊसतोडणी आणि वाहतूक (त्याचप्रमाणे इतर देयके) ठेकेदारांची थकीत रक्कमही टप्प्याटप्प्याने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित ऊसबिले आणि तोडणी-वाहतूक खर्च देखील लवकरच अदा केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सहकार्याचे आवाहन आणि आभार

कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकरी, सभासद आणि ऊसतोडणी-वाहतूक ठेकेदारांनी जे सहकार्य केले, त्याबद्दल प्रशासनाने सर्वांचे आभार मानले आहेत. आगामी गाळप हंगामातही सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

“आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि सर्वांच्या साथीने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू राहील.” — राहुल भैया मोटे (चेअरमन), महादेव खरे (व्हाईस चेअरमन), सचिन सिंगारे व प्रसाद घाटवे-पाटील (संचालक)

Leave a Reply