परंडा तालुक्यातील जकटेवाडी प्रकरण: पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, २२ जुलैला पुढील सुनावणी
यशश्री अपडेट्स | धाराशिव / छत्रपती संभाजीनगर: परंडा तालुक्यातील जगटेवाडी येथील बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा तातडीने शोध घेऊन तिला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयासमोर हजर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप करत महिलेचे वडील अर्जुन रोमन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे कडक निर्देश दिले आहेत.
कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि पोलीस तक्रारी
जगटेवाडी येथील रहिवासी अर्जुन रोमन यांची मुलगी जयश्री हिचा विवाह २ फेब्रुवारी २०१२ रोजी अनाळा येथील मारुती रेवडे यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. मात्र, विवाहानंतर सुरुवातीपासूनच त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते.
याच तणावातून जयश्री यांनी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी आंबी पोलीस ठाण्यात पती व सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ जानेवारी २०१७ रोजी पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात अर्जुन रोमन व त्यांच्या मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, पती मारुती रेवडे यांनीही परंडा पोलीस ठाण्यात प्रतिगुन्हा दाखल केला होता. मात्र, मुलगी आणि तिच्या दोन मुलांच्या भवितव्याचा विचार करून दोन्ही कुटुंबांनी अखेर परस्पर संमतीने हे वाद मिटवले आणि जयश्री पुन्हा पतीकडे नांदण्यास गेली.
शेतातील मुक्काम अन् जयश्री अचानक बेपत्ता!
वाद मिटल्यानंतरही जयश्रीला तिच्या आई-वडिलांशी संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पती मारुती रेवडे हा पत्नी व मुलांना घेऊन गावातील मुख्य घराऐवजी शेतातील घरात राहत होता. मुलांसाठी सर्व त्रास सहन करत जयश्री तिथे राहत असतानाच, ६ एप्रिल २०२६ रोजी ती अचानक बेपत्ता झाली.
विशेष म्हणजे, ती बेपत्ता झाली त्या दिवशी दोन्ही मुलांना गावातील मुख्य घरी आजी-आजोबांकडे पाठविण्यात आले होते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी पती मारुती रेवडे याने आंबी पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट (०५/२०२६) दाखल केला. मात्र, जयश्रीचे वडील अर्जुन रोमन यांनी सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणात जावई मारुती रेवडे याच्यावर तीव्र संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह; वडिलांची उच्च न्यायालयात धाव
आंबी पोलिसांनी आपल्या संशयाची दखल घेतली नसल्याचा आरोप अर्जुन रोमन यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे धाव घेऊन या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे (एलसीबी) वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर हताश होऊन त्यांनी अॅड. सुशांत चौधरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे आणि आदेश

या याचिकेवर ८ जुलै २०२६ रोजी माननीय उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांच्या संथ कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.
न्यायालयाचे प्रमुख निर्देश:
- सर्व संबंधित जबाबदार व्यक्तींनी आणि अधिकाऱ्यांनी २२ जुलै २०२६ रोजी पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहावे.
- त्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत बेपत्ता जयश्री यांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करावे.
उच्च न्यायालयाच्या या सक्त आदेशामुळे आता पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली असून, २२ जुलैच्या आत जयश्री यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
