रस्त्याच्या वादातून दाखल ॲट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणात चार आरोपी निर्दोष; धाराशिव विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

यशश्री अपडेट्स | धाराशिव, प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील मौजे कात्री येथील रस्त्याच्या वादातून शेजारी राहणाऱ्या एका महिलेने दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाणीच्या गुन्ह्यात धाराशिव येथील विशेष सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने सर्व पुराव्यांचा व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन या प्रकरणातील चारही आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींमध्ये बी.ए.एम.एस. (वैद्यकीय) आणि इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेणाऱ्या दोन युवकांचाही समावेश होता.

काय होते प्रकरण?

कात्री (ता. तुळजापूर) येथील राजाभाऊ देशमुख, अशोक देशमुख, सुदर्शन देशमुख आणि रितेश देशमुख यांचा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबासोबत शेतात जाण्या-येण्याच्या रस्त्यावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर पुढे पोलिसात तक्रार होण्यात झाले. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने या चौघांवर शेतात जाण्याच्या कारणावरून विनयभंग करणे, जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करणे आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी), विनयभंग आणि मारहाणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

८ साक्षीदारांची तपासणी

या संवेदनशील गुन्ह्याचा तपास तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांच्या वतीने धाराशिव येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण ८ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

बचावाचा कायदेशीर युक्तिवाद यशस्वी

आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील ॲड. प्रशांत प्र. कस्तुरे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात सरकार पक्षाने सादर केलेल्या साक्षीदारांची विविध कायदेशीर मुद्द्यांवर अत्यंत प्रभावी उलटतपासणी घेतली. मूळ वाद हा केवळ शेतातील रस्त्याचा असून, आरोपींना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच हे गंभीर आरोप करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ॲड. कस्तुरे यांनी मांडलेला सविस्तर कायदेशीर युक्तिवाद आणि सादर केलेले दाखले न्यायालयाने ग्राह्य धरले.

विशेष सत्र न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करत आरोपी राजाभाऊ देशमुख, अशोक देशमुख, सुदर्शन देशमुख आणि रितेश देशमुख या चौघांचीही या गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या दोन युवकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

Leave a Reply