यशश्री अपडेट्स | परंडा (प्रतिनिधी)
परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी पहाटे मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात झाल्याची चर्चा आहे.
पहाटेच टाकला छापा
पुणे, सांगली, सोलापूर आणि धाराशिव येथील दक्षता पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे पहाटे सुमारे ५ वाजता परंड्यातील बावची चौक व हैदर अली रोड परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत एकूण १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
या पथकात संतोष सावंत, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, अभिजित झिंगर, ऋषिकेश मते आणि अभिजित झोडगे यांचा समावेश होता.
गोडाऊनचे कुलूप तोडून कारवाई
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावची चौक परिसरातील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल साठवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. संबंधित मालक हजर न राहिल्याने पंचांसमक्ष गोडाऊनचे कुलूप तोडून तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार हे गोडाऊन समाधान खुळे व प्रदीप खुळे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील काही संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

हैदर अली रोडवर दुसरी कारवाई
एफडीएच्या पथकाने हैदर अली रोड परिसरातही छापा टाकत दाऊद फकीर पठाण याच्याकडून सुमारे ७८ हजार ७५५ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला.
या प्रकरणी धाराशिवचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी यांनी फिर्याद दाखल केली असून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
या कारवाईनंतर शहरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा शहरात असताना स्थानिक यंत्रणांना याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध धंद्यांवर कारवाईसाठी वारंवार बाहेरील जिल्ह्यांतील पथकांना यावे लागत असल्याने स्थानिक पातळीवरील नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण
या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात सुरू असली, तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अशा चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, जप्त केलेला सर्व मुद्देमाल परंडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
