यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक घडामोड घडली असून, ५०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला आता वेग मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाने १८.४६ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे निधीअभावी रखडलेले काम पुन्हा गतीने सुरू होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच स्वतंत्र ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. मात्र, आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध न झाल्याने या प्रकल्पाचे काम काही काळ रखडले होते. जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता.
यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला विशेष प्राधान्य देत आशियाई विकास बँकेच्या (ADB) माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागासाठी मंजूर झालेल्या निधीतून विशेष बाब म्हणून २७६.२५ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला. त्यातील पहिल्या टप्प्यात १८.४६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे बांधकामाला आता वेग येणार आहे.
हे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि नवीन जिल्हा रुग्णालय मिळून धाराशिवमध्ये एकूण १,००० खाटांची आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी लातूर, सोलापूर किंवा पुणे यांसारख्या शहरांकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा जिल्ह्यातच मिळणार आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धाराशिवच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही दर्जेदार आणि सुलभ उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.




