यशश्री अपडेट्स: धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्हा परिषदेतील अंतर्गत वातावरण सध्या चांगलेच तापले असून, काही महत्त्वाचे विभागप्रमुख आता येथून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत. विविध कारणांचे निमित्त पुढे करत अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज सादर केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या ५ महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थेट लातूरला बदली करून घेतल्याने या चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे. सध्या ३ ते ४ बडे विभागप्रमुख कौटुंबिक आणि आरोग्यासारख्या वैयक्तिक अडचणींचे कारण पुढे करत विनंती बदलीसाठी जोरदार फिल्डिंग लावून आहेत.
प्रशासक राज संपले, राजकीय बंधनांचा जाच वाढला?
काही काळापूर्वी जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट लागू होती, तोपर्यंत अधिकाऱ्यांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मनमोकळा कारभार करता येत होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. लोकप्रतिनिधींच्या आगमनामुळे अधिकाऱ्यांवर कायदेशीर बंधने आणि राजकीय नियंत्रण आले आहे, जे काहींना पचवणे जड जात असल्याचे बोलले जाते. त्यातच, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष आणि वाद पेटण्याची चिन्हे आहेत. अशा संघर्षात विनाकारण आपण ‘भरडले’ जाऊ नये, अशी भीती काही अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केली आहे.
शाब्दिक ‘उद्धार’ अन् अंतर्गत छळामुळे अधिकारी वैतागले!
एकेकाळी धाराशिव जिल्हा परिषद ही शांत, संयमी नागरिक आणि कोणाचाही विरोध नसलेला ‘थंड’ जिल्हा म्हणून अधिकाऱ्यांसाठी आवडीची पोस्टिंग मानली जात होती. मात्र, आता हेच चित्र उलटले असून अनेकांसाठी ही पोस्टिंग नकोशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयातील वरिष्ठ पातळीवरील कामाचा वाढता जाच आणि कनिष्ठ व सहकाऱ्यांसमोर जाहीरपणे होणारा शाब्दिक ‘उद्धार’ (अपमानस्पद वागणूक) यामुळे काही अधिकारी कमालीचे मानसिक दडपणाखाली आहेत. रोजच्या या वादावादीला तोंड देण्यापेक्षा शांतपणे आपला मार्ग निवडलेला बरा, असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांनी इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
