साहित्य विश्वात नवा इतिहास! डॉ. शरद गोरे यांच्या ऐतिहासिक कार्याची अमेरिकेच्या ‘वर्ल्ड बुक’मध्ये जागतिक विक्रमाची नोंद

  • शासकीय अनुदानाशिवाय तब्बल १९६ साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करणारे एकमेव साहित्यिक
  • मराठी साहित्य विश्वाच्या शिरपेचात मानाचा सुवर्णतुरा
    यशश्री अपडेट्स: पुणे प्रतिनिधी
    मराठी भाषा आणि साहित्याचा झेंडा जगभरात फडकवणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अतुलनीय आणि ऐतिहासिक साहित्यिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाची दखल घेण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) च्या ‘वर्ल्ड बुक’ मध्ये डॉ. गोरे यांच्या या अथांग कार्याची ‘जागतिक विक्रम’ (World Record) म्हणून अधिकृत नोंद करण्यात आली आहे. गेल्या ३३ वर्षांपासून मायमराठीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. गोरे यांना मिळालेल्या या अभूतपूर्व बहुमानामुळे संपूर्ण मराठी जगतातून आणि जागतिक साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकवर्गणीतून उभारला १९६ साहित्य संमेलनांचा डोंगर

साहित्य विश्वाच्या इतिहासात डॉ. शरद गोरे हे एकमेव असे अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरले आहे, ज्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर तब्बल १९६ मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे. या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शासनाच्या कोणत्याही अनुदानावर किंवा आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता, ही सर्व संमेलने त्यांनी केवळ लोकवर्गणी आणि जनसामान्यांच्या सहभागातून पार पाडली आहेत.
डॉ. गोरे यांनी साहित्याला खऱ्या अर्थाने बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवले. त्यांनी आयोजित केलेल्या संमेलनांमध्ये:

  • ग्रामीण, नवोदित, युवा, पर्यावरण आणि शिक्षक साहित्य संमेलने.
  • महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाहिलेली प्रबोधनपर संमेलने.
  • ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे, जनकवी पी. सावळाराम आणि राजकुमार काळभोर यांच्या नावाने सुरू केलेली विशेष संमेलने.
    केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर त्यांनी सातासमुद्रापार ‘मॉरिशस आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन’ आयोजित करून मराठी भाषेची पताका जागतिक स्तरावर अत्यंत अभिमानाने फडकवली आहे.

अष्टपैलू साहित्याचा सुवर्णप्रवास

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक येथील रहिवासी असलेले आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले डॉ. शरद गोरे यांचे कार्य केवळ संमेलनांच्या आयोजनापुरते मर्यादित नाही, तर ते एक अष्टपैलू प्रतिभावंत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ प्रवासातील काही ठळक टप्पे खालीलप्रमाणे:

  • वक्तृत्व आणि लेखन: एक फर्डे वक्ते म्हणून डॉ. गोरे यांनी आजवर विविध विषयांवर २ हजारांहून अधिक व्याख्याने देऊन जनमानसात प्रबोधनाचे काम केले आहे. तसेच त्यांनी १० अभ्यासपूर्ण ग्रंथांचे लेखन केले असून, छत्रपती संभाजी महाराज लिखित प्रसिद्ध ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी केलेला मराठी काव्यानुवाद रसिकमान्य आणि प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.
  • युगंधर प्रकाशन: नव्या दमाच्या आणि नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘युगंधर प्रकाशन’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आजवर १५५ दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
  • चित्रपटसृष्टीत कामगिरी: साहित्य क्षेत्रासोबतच त्यांनी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संगीतकार अशा अष्टपैलू भूमिका निभावत त्यांनी ५ मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास – सूर्या’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या कान्स (Cannes) आणि बर्लिन सारख्या जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे.

मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण:
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी भाषेची निस्पृह सेवा करणाऱ्या एका मराठी सुपुत्राच्या कार्याची नोंद थेट अमेरिकेच्या ‘वर्ल्ड बुक’ने घ्यावी, हा केवळ डॉ. शरद गोरे यांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी भाषिक जनतेचा फार मोठा गौरव आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *