ज्ञानेश्वरी राज निकम यांच्या पक्षांतरानंतर प्रभाग क्रमांक १९ मध्ये नाराजी; ‘मतदारांच्या मताचा मान राखला गेला नाही’, म्हणत रवी वाघमारे यांनी लावले माफीनाम्याचे बॅनर
यशश्री अपडेट्स | धाराशिव :
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये नगरसेविका ज्ञानेश्वरी राज निकम यांच्या पक्षांतरामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडून आलेल्या ज्ञानेश्वरी राज निकम यांनी आपल्या पतीसह सहकुटुंब भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांची जाहीर माफी मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी शहरात माफीनाम्याचे बॅनर लावले असून, या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
‘मतदारांच्या मताचा मान राखला गेला नाही’; वाघमारे यांची भूमिका

निवडणुकीच्या वेळी प्रभागातील नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर विश्वास ठेवून ज्ञानेश्वरी राज निकम यांना निवडून दिले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा गेल्याची भावना रवी वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
जनतेने दिलेल्या मताचा आणि विश्वासाचा योग्य मान राखला गेला नाही, अशी खंत व्यक्त करत वाघमारे यांनी प्रभागवासीयांची जाहीर माफी मागितली आहे.
माफीनाम्याच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने पक्ष बदलल्यामुळे मतदारांच्या भावनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पक्षांतरावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रवी वाघमारे यांनी लावलेल्या माफीनाम्याच्या बॅनरमुळे प्रभाग क्रमांक १९ मधील राजकीय वातावरण चांगलेच चर्चेत आले आहे.
लोकप्रतिनिधींचे पक्षांतर आणि मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास यावरून सुरू झालेल्या या चर्चेकडे आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
