भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांना ५ किलो साखर; भूमिहीन व शेतमजूर कुटुंबांना दिवाळी किटचे घरपोच वाटप
यशश्री अपडेट्स | परंडा : भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी ‘माणुसकीची दिवाळी’ या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील सर्व रेशनकार्डधारक कुटुंबांना प्रत्येकी ५ किलो साखरेचे वाटप करण्यात येणार असून, भूमिहीन व शेतमजूर दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे दिवाळी किट घरपोच दिले जाणार आहे.
यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात कुटुंबांवरील खर्चाचा भार काही प्रमाणात कमी व्हावा आणि प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आपल्या संदेशातून स्पष्ट केले आहे.
तिन्ही तालुक्यांतील रेशनकार्डधारकांना ५ किलो साखर
भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांतील सर्व रेशनकार्डधारक कुटुंबांना सालाबादप्रमाणे यंदाही प्रत्येकी ५ किलो साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच यावर्षी दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या भूमिहीन आणि शेतमजूर कुटुंबांसाठी स्वतंत्रपणे ‘माणुसकीची दिवाळी किट’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांपर्यंत दिवाळीच्या आवश्यक वस्तू पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दिवाळी किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश
‘माणुसकीची दिवाळी किट’मध्ये रवा, स्वयंपाकाचे तेल, हरभरा डाळ, मैदा, चिवडा मसाला, चिरमुरा, साखर, चहापत्ती, सुगंधी तेल, मोती अंघोळीचा साबण आणि सुगंधी उटणे अशा विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. दिवाळीच्या काळात फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंसह दैनंदिन वापरातील साहित्यही या किटमध्ये देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, हे किट संबंधित लाभार्थ्यांच्या घरापर्यंत सन्मानपूर्वक पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या तयारीसाठी काही प्रमाणात मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वितरणाची जबाबदारी
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच ग्रामपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांपर्यंत दिवाळी किट पोहोचविण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
‘संकटाच्या काळात तुमच्या पाठीशी उभा आहे’
आपला भूम-परंडा-वाशी मतदारसंघ हेच आपले कुटुंब असून, या कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केली. दुष्काळाचे सावट असले तरी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद कमी होऊ नये आणि प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रमाचा संकल्प केल्याचे त्यांनी नमूद केले.
दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशासोबत नागरिकांच्या आयुष्यातील संकटांचा अंधार दूर व्हावा, प्रत्येकाच्या घरात समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थनाही त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील गरजू कुटुंबांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
