एसटी प्रवर्गात समावेश करून प्रमाणपत्र देण्याची मागणी; धाराशिव, उमरगा, भूम, परंडा व नळदुर्ग येथे शासनाला निवेदन
यशश्री अपडेट्स | धाराशिव
धनगर समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात सोमवारी (दि. ७) विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करून समाजबांधवांना एसटी प्रवर्गाची प्रमाणपत्रे देण्यात यावीत, यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव, उमरगा, भूम, परंडा आणि नळदुर्ग येथे मोर्चे काढून तसेच तहसील व प्रशासकीय कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली.
राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील विविध संघटना, सकल धनगर समाज, धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती आणि अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शासनाविरोधात आपला आवाज बुलंद केला. समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
धाराशिव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव येथे सकल धनगर समाज, अहिल्या सखी मंच आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे वेधले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून त्यानुसार प्रमाणपत्रे देण्यात यावीत, मुंबई ते बेंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या मार्गास हुतात्मा वीर शिरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, गणेश सोनटक्के, लिबराज डुकरे, सुभाष मैंदाड, नाना वाकडे, दादा वाचे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षा अॅड. जयत्री तेरकर, अहिल्या सखी मंचच्या अध्यक्षा डॉ. शैलजा पैकेकर, देवशाला हाके, अर्चना मैंदाड यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमरगा येथे मोर्चा व निवेदन

उमरगा येथेही धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजबांधवांनी एकत्र येत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात सहभाग नोंदविला.
नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालयात निवेदन
नळदुर्ग येथे तुळजापूर तालुका धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर अप्पर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथेही समाजबांधवांनी एकत्र येत शासनाकडे आपल्या मागण्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.
यावेळी तुळजापूर तालुका धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह विविध पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
परंडा येथे तहसीलदारांना निवेदन

परंडा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली.
तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे जंक्शनला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, श्री संत बाळुमामा ट्रस्ट देवस्थानच्या आर्थिक व्यवहाराची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ट्रस्टवर धनगर समाजातील व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
भूम येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भूम येथे धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने नामकरण करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
सोमवारी (दि. ७) भूम येथील नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी प्रभाकर डोंबाळे, रणजित हापटे, मधुकर अर्जुन, राहुल देवकते, रघुनाथ वाघमोडे, शिवाजी कांबळे, सुभाष देवकते, आदित्य डोंबाळे, दयानंद देवकते, मिथुन अर्जुन, राजेंद्र शिंदे, रवींद्र मासाळ, दादासाहेब ठोंबरे, जीवन कांबळे, किशोर कांबळे, सुजित माने, दादा देवकते, मल्हारी चोरमले, निशिकांत डोंबाळे, दादासाहेब सातपुते, लहू अर्जुन, नवनाथ माने, बिरमल गोयकर यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी झालेल्या या आंदोलनामुळे धनगर समाजाच्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शासनाने समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या
1. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा.
2. धनगर समाजातील पात्र नागरिकांना एसटी प्रवर्गाची प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
3. धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
4. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे.
5. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करण्यात यावे.
6. श्री संत बाळुमामा ट्रस्ट देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी.
7. श्री संत बाळुमामा ट्रस्टवर धनगर समाजातील व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
8. धनगर समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
