यशश्री अपडेट्स | धाराशिव
कळंब : कळंब शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक होत असून, या प्रकरणातील नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा आणि मावळ येथील सुशांत सुतार या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. पोलिसांनी तपासासाठी तीन दिवसांची वाढीव कोठडी मागितली होती; मात्र न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची नावे लागल्याची माहिती समोर येत असून, ड्रग्जची विक्री करणाऱ्यांसह त्याचे सेवन करणारे व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि सीडीआरची तपासणी
ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क नेमके कुठपर्यंत पोहोचले आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे. संशयितांचे बँक खाते, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), संपर्कातील व्यक्ती तसेच इतर इलेक्ट्रॉनिक व भौतिक पुरावे तपासले जात आहेत.
ड्रग्जची खरेदी-विक्री कोणामार्फत होत होती, त्यासाठी आर्थिक व्यवहार कसे केले जात होते, या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच ड्रग्ज कोणत्या ठिकाणी आणि कोणाला पुरवले जात होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
तपासातून काही नावे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात असल्याने या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांकडून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज; व्यावसायिक प्रमाणामुळे कायदेशीर अडचणी वाढणार
या प्रकरणात ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण व्यावसायिक श्रेणीशी संबंधित असल्याने आरोपींसमोरील कायदेशीर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवताना देखील गंभीर कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
मात्र, आरोपींचा दोष न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी असून, तपासातील निष्कर्ष आणि न्यायालयीन निर्णयानंतरच त्याबाबत अंतिम स्थिती स्पष्ट होणार आहे.
सहा आरोपी; चौघे न्यायालयीन कोठडीत, दोघे पोलिस कोठडीत
या गुन्ह्यात आतापर्यंत निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड आणि अक्षय रिटे हे चार आरोपी जेलमध्ये आहेत. तर मोसीन सलीम मिर्झा आणि सुशांत सुतार हे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
या सहा आरोपींच्या भूमिकांचा स्वतंत्रपणे तपास केला जात असून, ड्रग्ज पुरवठा साखळीतील त्यांचा सहभाग, एकमेकांशी असलेले संबंध आणि आर्थिक व्यवहार याबाबत पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे.
४ ऑगस्टच्या कारवाईत रंगेहात अटक
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ४ ऑगस्ट रोजी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली होती. या कारवाईत ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी आरोपींना ड्रग्जसह रंगेहात पकडल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाईत सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज आणि दुचाकीसह एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर तपासाची दिशा अधिक व्यापक झाली असून, ड्रग्जचा पुरवठा आणि वितरण करणाऱ्या साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
‘ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करा’ अशी नागरिकांची अपेक्षा
ड्रग्ज हे केवळ एक बेकायदेशीर अमली पदार्थ नसून तरुण पिढीच्या भवितव्याला उद्ध्वस्त करणारे गंभीर सामाजिक संकट आहे. शहर आणि ग्रामीण भागात ड्रग्जचा वाढता धोका रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे.
विशेषतः राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी नागरिकांमध्ये भावना आहे. कोणत्याही व्यक्तीला राजकीय किंवा सामाजिक पाठबळ असले तरी कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पोलिस प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याची चर्चा आहे.
पोलिसांच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक शकील शेख तपासाची धुरा सांभाळत आहेत. ड्रग्ज विक्रीचे नेटवर्क, त्यामागील आर्थिक व्यवहार, पुरवठ्याचे स्रोत आणि सेवन करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात, ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता आणि त्यामागे मोठे नेटवर्क आहे का, याकडे आता धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके, कळंब पोलीस ठाण्याचे सपोनि मगर यांच्यासह पोहेकॉ राठोड, जानराव, गादेकर, जाधवर, चौरे, पोना जाधवर, ढगारे, पोलीस अंमलदार मुंगळे, पोहेकॉ शेख, माळवे, बोईनवाड, आरब, चापोहेकॉ माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
ड्रग्जविरोधातील या तपासातून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, विक्रीसोबतच सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असल्याने कळंब ड्रग्ज प्रकरणाचे पुढील तपासाचे टप्पे महत्त्वाचे ठरणार आहेत.
