आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

परंडा : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा परंडा तालुक्यात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती सभागृहात ५ मे रोजी आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत या अभियानाचा श्रीगणेशा झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सभापती अर्चनाताई जाधव, उपसभापती परसू गवरे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. निंबोरेकर तसेच विविध विभागांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी वर्षभर आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेत महिलांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. “घराचा कणा असलेली स्त्री निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यामुळे माताभगिनींनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासण्या, पोषण आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
उपसभापती परसू गवरे यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत पंचायत समिती सदस्य रेशमा गायकवाड, गणेश पिल्ले, मालती कोल्हे, मोनिका पाटील, दीपली खुडे यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत स्वच्छता, पोषण, मातृ-शिशु आरोग्य, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती यांसारख्या विविध उपक्रमांना गती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *