यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी
विहिरीतील पाण्याच्या वापराच्या वादातून सख्या चुलत भावाचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी धाराशिव जिल्हा न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांनी हा निकाल देत आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील (रा. सराटी, ता. तुळजापूर) यास जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सराटी शिवारातील गट क्रमांक १०५ मधील वडिलोपार्जित जमिनीत असलेल्या सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून आरोपी नवनाथ पाटील आणि त्याचा चुलत चुलता नरसाप्पा बाबुराव पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यापूर्वी गावातील पंच समितीसमोर झालेल्या बैठकीत नरसाप्पा पाटील यांना विहिरीत मोटार टाकून पाणी घेण्यास परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान, १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी नरसाप्पा पाटील हे विहिरीवरील मोटारीला वायर जोडण्यासाठी गेले असता, आरोपी नवनाथ पाटील याने त्यांच्या पाठीमागून येत कोयत्याने डोक्यावर वार केला. त्यानंतर हनुवटीवरही वार केल्याने नरसाप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम आनंदूर आणि नंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रमेश पंडित पाटील यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. आर. तायवाडे यांनी केला, तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आटोळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने एकूण १७ साक्षीदार तपासले. प्रकरणातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रमेश पाटील हे साक्षीदरम्यान फितूर झाले. मात्र, जखमी नरसाप्पा पाटील यांनी मृत्यूपूर्वी आपल्या भावाला मोबाईलवरून “मला नव्याने सत्तुरने डोक्यात मारले आहे” असे सांगितल्याचा पुरावा न्यायालयाने तोंडी मृत्यूपूर्व जबाब (Dying Declaration) म्हणून ग्राह्य धरला.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन एस. सूर्यवंशी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीपुरावे आणि दाखल न्यायनिर्णयांचा विचार करून न्यायालयाने आरोपी नवनाथ पाटील यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन एस. सूर्यवंशी यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एल. जट्टे आणि सहाय्यक पोलीस फौजदार जी. व्ही. शिंदे यांनी सहकार्य केले.
