यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीत पाच कोयते व तीन संशयित मोबाईल हस्तगत केले आहेत.
पोलीस अमलदार भुजंग सुखदेव आडसुळ (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल जेजेराम सल्ले (वय 40, रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी 11 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या भोत्रा येथील घराची झडती घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या हत्यारबंदी आदेशानंतरही आरोपीच्या ताब्यात अवैधरित्या विविध आकाराचे पाच धारदार लोखंडी कोयते आढळून आले. तसेच एक सॅमसंग टॅब, एक विवो मोबाईल आणि एक सॅमसंग मोबाईल असा एकूण सुमारे 5,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 306/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 112, 117 व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशानुसार मपोहेकॉं/1004 तांबोळी यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहेकॉं/1441 गायकवाड करीत आहेत. हा गुन्हा 12 जून 2026 रोजी सकाळी 7.37 वाजता दाखल करण्यात आला.
भोत्रा येथे घरझडतीत पाच कोयते जप्त; हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
