यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव येथील जनता सहकारी बँकेच्या सात संचालकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्देशानुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. सहकारी बँकांच्या संचालक पदासंदर्भातील नव्या नियामक तरतुदींनुसार सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक पदावर राहता येत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर व नोव्हेंबर 2022 मध्ये जारी केलेल्या नियमांनुसार सहकारी बँकेच्या संचालकांचा कार्यकाळ मर्यादित करण्यात आला आहे. या नियमांच्या आधारे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यानंतर सात संचालकांना तत्काळ पदमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
अपात्र ठरलेल्या संचालकांमध्ये बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजिनाथ शिंदे, विश्वास शिंदे, सुभाष धनुरे, तानाजी चव्हाण, करुणा संजय पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी आणि नंदकुमार नागदे यांचा समावेश आहे.
जनता सहकारी बँकेच्या 13 सदस्यीय संचालक मंडळामध्ये दोन संचालक – निवृत्तीराव भोसले आणि सुभाष गोविंदपूरकर – यांचे निधन झाले असून उर्वरित 11 संचालक कार्यरत होते. त्यापैकी सात संचालक अपात्र ठरल्याने आता केवळ चार संचालकांवर बँकेचा कारभार राहणार आहे. त्यामुळे बँकेच्या प्रशासनात आगामी काळात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पिराजी मंजुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने संबंधित पक्षांची बाजू ऐकून निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर याचिकाकर्ते आणि बँक प्रशासन यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद विचारात घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.
महाराष्ट्रातील पाच जिल्हे तसेच कर्नाटक राज्यात जनता सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. दरम्यान, काही सहकारी बँकांमध्ये संचालक वर्षानुवर्षे पदावर कायम असल्याने अशा प्रकरणांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे.
जनता सहकारी बँकेचे 7 संचालक अपात्र; रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर कारवाई
