यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी):दि. ३ जून : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, शासकीय योजनांमधील अडचणी तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध लोकहिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनामध्ये वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, बेरोजगारीची गंभीर समस्या, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. या समस्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची नावे वगळली जाणे, केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे आणि त्यामुळे अनेक महिलांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पात्र लाभार्थींना कोणत्याही प्रक्रियात्मक अडचणींचा फटका बसू नये आणि त्यांना योजनेचा अखंडित लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, मसूद शेख, नगरसेवक बबलूभाई शेख, पंकज भोसले, सर्फराज कुरेशी, एजाज काझी, विशाल शिंगाडे, सुनील आंबेकर, अन्वरभाई शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना न्याय द्यावा,” अशी भूमिका शिष्टमंडळाने यावेळी मांडली.
जनतेच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
