यशश्री अपडेट्स–धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर भव्य शक्तीप्रदर्शन करत बसवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला. या वेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार सुरेश धस, अर्चनाताई चाकूरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बसवराज पाटील यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करत विरोधकांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “माझी उमेदवारी ही महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या एकमताने निश्चित करण्यात आली आहे. माझ्या उमेदवारीमुळे कोणतीही नाराजी निर्माण झालेली नाही. सर्व नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील काही इच्छुक नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेषतः भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी तसेच माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू सुजितसिंह ठाकूर यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी बसवराज पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नाराजीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला असता, बसवराज पाटील यांनी अशा सर्व चर्चा फेटाळून लावत पक्षात कोणताही असंतोष नसल्याचे सांगितले. “पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करत आहेत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून सर्वजण पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विजयाचा दावा केला. “धाराशिव, लातूर आणि बीड या तीनही जिल्ह्यांमध्ये महायुतीची ताकद भक्कम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा आम्हाला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय महायुतीचाच होणार, याबाबत आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. आगामी काळात महायुती आणि विरोधी आघाड्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, महायुती आणि विरोधकांमधील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.
