यशश्री अपडेट्स-सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी खुनाचा प्रकार ताजा असतानाच याच तालुक्यात आज (ता. 29 मे) पुन्हा एकदा शेतजमिनीच्या वादातून सामूहीक हत्याकांड झाले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा, त्यांच्यासोबत असलेल्या एकाचा, अशा सहा जणांचा खून करण्यात आला आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील चडचणच्या (जि. विजयपूर) निराळे कुटुंबीयांनी गोविंदपूरच्या रामपुरे कुटुंबीयांकडून शेतीजमीन खरेदी केली होती. ती शेती खरेदी केल्याचा रागातून शुक्रवारी (ता. २९ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबाराच्या घटनेमध्ये निराळे कुटुंबातील पाच सदस्यांचा, तर त्यांच्या सोबत असलेल्या मुस्लीम समाजातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व गोविंदपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे निराळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोविंदपूरमध्ये बराच काळ गोळीबाराचा आवाज येत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले, गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. चडचण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते पुढील तपास करीत आहेत.
