शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू; उमरगा उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ, ठिय्या आंदोलन

यशश्री अपडेट्स -उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.

महात्मा फुले नगर येथील मैना रविराज सालके (वय ३५) यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० मे रोजी सकाळी सुमारे १० वाजता त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वॉर्डात हलविण्यात आले. काही वेळातच त्यांच्या शरीराची हालचाल बंद पडल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेता थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी तीन ते चार तास उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!