
२३ ऑक्टोबर रोजी मतदान; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहन
यशश्री अपडेट्स | धाराशिव
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या कामात नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. तसेच निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १४ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आणि विविध कक्षांमार्फत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
निवडणूक कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची बाब आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि लागू नियमांचे प्रत्येक टप्प्यावर काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी. कामकाजात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होणार नाही, याची संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मतदान पथकांसाठी योग्य नियोजन आणि पोलीस बंदोबस्त
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथकांचे योग्य नियोजन करावे. संबंधित तहसील कार्यालयांतून मतदान पथके रवाना होणार असल्याने त्यांच्या वाहतुकीसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत. मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील पात्र आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविणे आवश्यक आहे. मतदानाची तारीख, वेळ, मतदान केंद्रांची माहिती आणि मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना योग्य मार्गदर्शन करावे. यासाठी प्रभावी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवून अधिकाधिक पदवीधर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी केले.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला महत्त्व असून, मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक मतदाराची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध निवडणूक कक्षांच्या कामकाजाचा आढावा
बैठकीत निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान पथकांचे नियोजन, वाहन व्यवस्था, विविध परवानग्यांचे वितरण, कायदा व सुव्यवस्था, मतदान व्यवस्थापन, मतपत्रिकांची तपासणी व वाटप, अवैध मद्यवाटपाला प्रतिबंध, प्रसारमाध्यमांशी संबंधित कामकाज, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, स्ट्राँग रूम व्यवस्था, निवडणूक खर्च नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान, टपाली मतपत्रिका आणि मतदार मदत कक्ष अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांत सुरू असलेल्या कामकाजाचा आणि पूर्वतयारीचा आढावा सादर केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्यासह विविध निवडणूक कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठकीच्या शेवटी दिले.
