‘नीट’ पेपरफुटीचे बीड कनेक्शन; सूत्रधार प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी मूळचा बीडचा रहिवासी

यशश्री अपडेट्स – बीड

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट बीड जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूर येथून अटक करण्यात आलेला रसायनशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा मूळचा बीड शहरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीमध्ये प्रा. कुलकर्णीचा महत्त्वाचा सहभाग होता. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेत बहुतांश प्रश्न हे रसायनशास्त्र विषयाचे असल्याने सीबीआयच्या संशयाची सुई प्रा. कुलकर्णी याच्याकडे वळली आणि त्यावरूनच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात सध्या तीव्र चर्चा आणि खळबळ उडाली आहे.

देशभरात गाजत असलेल्या या गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा अत्यंत वेगाने तपास करत आहेत. इतर राज्यांसोबतच महाराष्ट्रातही या पेपरफुटीचे कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले होते. याच तपासाच्या पुढच्या टप्प्यात सीबीआयच्या पथकाने लातूर येथे छापा टाकून प्रा. कुलकर्णी याला अटक केली. प्राथमिक चौकशीत प्रा. कुलकर्णी हा लातूरच्या एका नामांकित महाविद्यालयात रसायनशास्त्रा चा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता आणि तिथूनच ते निवृत्त झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान प्रा. कुलकर्णी याचे मूळ घर आणि कौटुंबिक पार्श्वभूमी बीड जिल्ह्याशी जोडलेली असल्याचे स्पष्ट झाले. कुलकर्णीचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण बीडमध्येच झाले असून त्याचे वडील बीड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीच्या निमित्ताने कुलकर्णी लातूरमध्ये स्थायिक झाला असला, तरी त्याचे बीडशी अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात त्याची वडिलोपार्जित शेती असून, या जमिनीच्या देखभालीसाठी त्याचे नेहमी बीड आणि पाटोदा येथे येणे-जाणे असायचे.

याशिवाय, बीड शहरातील शाहूनगर भागातील पोल फॅक्टरी परिसरात कुलकर्णीचे एक वडिलोपार्जित घर आहे. हे घर गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने देण्यात आले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच हे जुने घर पाडून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या माध्यमातून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेल्या या अत्यंत संवेदनशील गैरव्यवहार प्रकरणात थेट बीडचा मुख्य दुवा निघाल्याने संपूर्ण जिल्हाभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *