यशश्री अपडेट्स |परांडा :
परंडा तालुक्यातील कंडारी येथील आराध्य दैवत श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील देवाचा पवित्र मुखवटा चोरीला गेल्याच्या घटनेने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या चोरीचा निषेध करण्यासह चोरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ जेरबंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कंडारी ग्रामस्थ यांनी मंदिराच्या शिखरावर बसून उपोषण सुरू केले आहे.
कंडारी येथील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून, हे मंदिर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरातील देवाचा पवित्र मुखवटा चोरीला गेल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असून, या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

चोरीच्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच मंदिरातील धार्मिक वस्तू आणि देवाच्या अलंकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अमोल तिबोळे यांनी केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी त्यांनी मंदिराच्या शिखरावर बसून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, मंदिराच्या शिखरावर सुरू असलेल्या या उपोषणामुळे प्रशासनासमोरही परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. चोरीचा तपास जलद गतीने करून आरोपींना जेरबंद करावे आणि चोरीला गेलेला देवाचा पवित्र मुखवटा तातडीने शोधून मंदिरात परत आणावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

‘देवाच्या मुखवट्याची चोरी हा केवळ चोरीचा प्रकार नसून भाविकांच्या श्रद्धेवर घाला आहे. आरोपींना तात्काळ अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार’ असा पवित्रा आंदोलनकर्ते अमोल तिबोळे यांनी घेतला आहे.
या घटनेमुळे कंडारी परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
