लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेत परंड्याच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; अर्जुन पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

यशश्री अपडेट्स | परंडा : वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय व बावची विद्यालय, परंडा येथील विद्यार्थ्यांनी लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लातूर विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये परंडा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये बावची विद्यालयातील कु. पाटील अर्जुन विजय याने बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अर्जुन पाटील याची आगामी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. साक्षी सुरेंद्र भोजने हिने १७ वर्षे वयोगटातील ५२ किलो वजन गटातील कराटी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर तिने विभागीय स्तरावरील निवड मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशाचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थापक श्री. बिभिषण रोडगे आणि मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अर्जुन पाटील याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्याने त्याच्याकडून आगामी स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच साक्षी भोजने हिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठीही शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनीही दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!