एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी जरांगेंचा सरकारला इशारा; ‘मागण्या मान्य करा, अन्यथा महाराष्ट्र बंद’

यशश्री अपडेट्स | पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली. “विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा त्यांच्या भविष्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ताकद आमच्यात आहे,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि आयोगाच्या कारभाराबाबत पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देताना जरांगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचे आंदोलन जातीपलीकडचे असून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात एकजूट राहण्याचे आवाहन

“तुम्ही विद्यार्थी म्हणून आंदोलन करत आहात. त्यामुळे आंदोलन करताना दोन-तीन ठिकाणी विखुरले जाऊ नका. एकजुटीने लढा. तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहात. त्यामुळे तुमची एकजूट हीच तुमची ताकद आहे,” असे जरांगे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यापूर्वी दोन-दोन वर्षे आंदोलने झाली. त्यावेळी ती आंदोलने राजकीय होती का? मग सध्याचे विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय आहे, असे कोणत्या आधारावर म्हटले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“मला आंदोलनस्थळी जाऊ नका, असे सांगण्यात आले होते. मात्र, उपोषणाला बसलेल्या मुलांचे काय? त्यांच्या मागण्यांकडे कोण लक्ष देणार? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका. हा प्रश्न कोणत्याही एका जातीचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे,” असे जरांगे म्हणाले.

‘हिंदुत्वाची जहागीरदारी कोणाचीही नाही’

मनोज जरांगे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. “तुम्ही हिंदुत्व म्हणता, मग आम्ही कोण आहोत? हिंदुत्वाची जहागीरदारी कोणाचीही नाही. हिंदूनेच हिंदूवर अत्याचार करायचा असेल तर कसले हे हिंदुत्व?” असा सवाल त्यांनी केला.

जाती-जातींत भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. “अन्याय करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही. मी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसोबत आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनातून मागे न हटण्याचे आवाहन केले.

‘आयोगाचा अध्यक्ष बदलण्याची मागणी असेल तर एका दिवसात निर्णय घ्या’

जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने गांभीर्याने ऐकून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे संबंधितांनीच दिली पाहिजेत; मात्र त्यांची उत्तरे दुसरेच लोक देत असल्याचे त्यांनी म्हटले.

“अधिकारी तुमचे नोकर आहेत की तुम्ही अधिकाऱ्यांचे प्रवक्ते आहात? आयोगाचा अध्यक्ष बदलण्याची मागणी विद्यार्थी करत असतील, तर सरकारने त्यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

‘गरिबाच्या मुलांनी अधिकारी होऊ नये का?’

“गरिबाच्या मुलांनी अधिकारी होऊ नये का? या पोरांविषयी इतका द्वेष का? त्यांच्या आक्रोशाकडे बघा. आंदोलन करण्याची वेळच विद्यार्थ्यांवर येऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे,” असे जरांगे म्हणाले.

प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना आंदोलन करावे लागणे किंवा जेलमध्ये जाण्याची वेळ येणे योग्य नाही. सरकारच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. “तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करू नका,” असे ते म्हणाले.

‘पारदर्शक असाल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’

जरांगे यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केला. “तुम्ही पारदर्शक आहात ना, मग ईव्हीएम बदला आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,” अशी मागणी त्यांनी केली.

सध्या महाराष्ट्रासमोर दुष्काळाचेही मोठे संकट आहे. शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संयमाचा बांध तुटू देऊ नका’

राज्यातील परिस्थिती संवेदनशील असून सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे जरांगे म्हणाले. “संयमाचा बांध तुटू देऊ नका. सरकारने परिस्थिती समजून घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न प्रलंबित ठेवण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढावा. विद्यार्थ्यांच्या मनातील नाराजी दूर करून सरकारने विद्यार्थ्यांची मने जिंकली पाहिजेत, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेणार, याकडे आता विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!