मंचकी निद्रेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; ११ ऑक्टोबरला देवी सिंहासनावर विराजमान होणार

आठ दिवसांची मंचकी निद्रा सुरू; महिषासुर वधाच्या आख्यायिकेशी जोडलेली प्राचीन धार्मिक परंपरा

यशश्री अपडेट्स | तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक मंचकी निद्रेने प्रारंभ झाला आहे. सायंकाळी अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या. भाद्रपद कृष्ण अष्टमीपासून अमावास्या समाप्तीपर्यंत देवींची ही मंचकी निद्रा सुरू राहणार असून, आठ दिवसांची निद्रा पूर्ण झाल्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहेत.

मंचकी निद्रेच्या धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवींचा पलंग घासून-पुसून स्वच्छ धुऊन घेतला. तसेच आराधी महिलांनी मंचकी निद्रेसाठी आवश्यक असलेल्या गाद्यांमधील कापूस पिंजून घेतला. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या तयारीनंतर अभिषेक पूजा संपन्न झाली आणि देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या. या विधीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.

महिषासुराच्या संहाराशी जोडली गेलेली ‘घोर निद्रा’

धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराच्या वाढत्या अत्याचारांपासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी श्री तुळजाभवानी देवी योगनिद्रेत राहून महिषासुराशी युद्ध करण्याची तयारी करीत होत्या. महिषासुराच्या अत्याचारांमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवीला जागृत केले. त्यानंतर देवीने घोर रूप धारण करून महिषासुराचा संहार केला. या धार्मिक आख्यायिकेमुळे देवीच्या या निद्रेला ‘घोर निद्रा’ असेही संबोधले जाते.

वर्षातून तीन वेळा २१ दिवसांची मंचकी निद्रा

देशभरातील शक्तिपीठांच्या धार्मिक परंपरेत श्री तुळजाभवानी देवींचे विशेष स्थान आहे. देवीची मूर्ती चलमूर्ती असल्याने वर्षभरातील धार्मिक परंपरेनुसार देवी तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेतात. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस, सीमोल्लंघनानंतर पाच दिवस आणि शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस अशा तीन टप्प्यांत मंचकी निद्रेची परंपरा पाळली जाते.

११ ऑक्टोबरला सिंहासनारोहण; नवरात्रोत्सवातील विधींना प्रारंभ

आठ दिवसांची मंचकी निद्रा पूर्ण झाल्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात ११ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होऊन विराजमान होणार आहेत. देवींच्या सिंहासनारोहणानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

मंचकी निद्रा काळात दैनंदिन फोटो प्रसिद्ध होणार नाहीत

दरम्यान, मंचकी निद्रेच्या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दररोज प्रसिद्ध करण्यात येणारे देवींचे दैनंदिन फोटो प्रसिद्ध केले जाणार नाहीत. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह पुजारी मंडळाचे सदस्य आणि मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

आई तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या या पारंपरिक धार्मिक विधीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या सोहळ्याची चाहूल लागली असून, ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देवीच्या सिंहासनारोहणाकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!