‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा; अतिवृष्टीच्या मदतीवरून भाजप जिल्हाध्यक्षांचा ठाकरे गटाला पलटवार
यशश्री अपडेट्स|धाराशिव : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना मदत दिली असून, धाराशिव जिल्ह्यासाठी गेल्या वर्षीच्या नुकसानीपोटी आतापर्यंत तब्बल १ हजार ५८ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असा ठाकरे गटाकडून करण्यात येणारा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला.
कुलकर्णी यांनी सांगितले की, संकटाच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मदतीचे निकष शिथिल केले. तसेच मदतीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अधिक क्षेत्रासाठी शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
धाराशिव जिल्ह्यासाठी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात १८९ कोटी रुपये, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी २९२ कोटी रुपये आणि त्यानंतर आणखी ५७७ कोटी रुपये, अशी एकूण १ हजार ५८ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
या निधीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, मदतीचे प्रस्ताव आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘शेतकऱ्यांच्या दुःखाचे राजकारण करू नका’
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणींचे राजकारण करून त्यांना दिशाभूल करू नये, असे आवाहन दत्ता कुलकर्णी यांनी केले. शासन आदेशाची होळी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाकडून सरकारच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी २०२१ मध्ये त्यांच्या सरकारच्या काळात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत देण्यात आली, किती क्षेत्राला मदत मिळाली आणि त्यावेळी मदतीचे निकष काय होते, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
यंदा दुष्काळाचे संकट
दरम्यान, यंदा धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया सुरू केली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
“गेल्या वर्षी अतिवृष्टीचे संकट होते, तर यंदा दुष्काळाचे संकट आहे. संकट कोणतेही असो, त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. त्यामुळे राजकीय स्टंटबाजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले.
‘आकडेवारी घेऊन या; आम्हीही हिशेब घेऊन मैदानात उतरतो’
ठाकरे गटाकडून सरकारच्या मदतीवर आरोप होत असतील, तर त्यासाठी ठोस आकडेवारी समोर ठेवावी. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, अशी भूमिका कुलकर्णी यांनी मांडली.
“आकडेवारी घेऊन या; आम्हीही हिशेब घेऊन मैदानात उतरतो. ‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब जनतेसमोर द्यावा,” असे खुले आव्हान दत्ता कुलकर्णी यांनी ठाकरे गटाला दिले.
अतिवृष्टी असो अथवा दुष्काळ, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
