गावठी कट्टा कमरेला, जिवंत काडतुस खिशात; कळंबमध्ये एकास अटक

कळंब तालुक्यातील भाटसांगवी पाटीजवळ कारवाई; २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यशश्री अपडेट्स | धाराशिव

कळंब तालुक्यातील भाटसांगवी पाटीजवळ गावठी कट्टा व जिवंत काडतुस घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका इसमास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतुस असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळंब परिसरात नियमित पेट्रोलिंग करीत असताना भाटसांगवी पाटीजवळ एक इसम गावठी कट्टा बाळगून थांबलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर तातडीने भाटसांगवी पाटीच्या दिशेने रवाना झाले.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, मिळालेल्या माहितीनुसार एक इसम तेथे आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. या झडतीदरम्यान त्याच्या कंबरेला खोवलेला लोखंडी धातूचा व लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी संबंधित शस्त्र व जिवंत काडतुस ताब्यात घेतले असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास पुढील कायदेशीर कारवाईसाठी कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडे हे शस्त्र कोठून आले, ते कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आले होते तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे तसेच चापोअं विनायक दहीहांडे यांच्या पथकाने केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!