विकास निधी : 13 जिल्हा परिषद गटांना प्रत्येकी दीड कोटी; आमदार सावंतांची घोषणा

निधी वाटपाच्या मुद्द्यावर भाजपच्या गोटात नाराजीची खदखद; पुण्यात लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची बैठक

यशश्री अपडेट्स |धाराशिव :

भूम, परंडा आणि वाशी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली आहे. मतदारसंघातील एकूण 13 जिल्हा परिषद गटांना हा निधी उपलब्ध होणार असून, निधी कोणत्या कामांसाठी वापरायचा याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कामे सुचवावीत, असेही आमदार सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

या घोषणेमुळे ग्रामीण भागातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे जिल्हा परिषदेमधील निधी वाटप आणि अधिकारांच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमदार सावंत यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातही चुळबूळ वाढल्याचे चित्र आहे.

13 गटांना समान निधी

भूम तालुक्यातील ईट, सुकटा, पाथरूड, वालवड आणि आष्टा, परंडा तालुक्यातील शेळगाव, आनाळा, जवळा, डोंजा आणि लोणी, तर वाशी तालुक्यातील पारगाव, पारा आणि तेरखेडा अशा एकूण 13 जिल्हा परिषद गटांचा यामध्ये समावेश आहे.

प्रत्येक गटाला दीड कोटी रुपये या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास 13 गटांसाठी एकूण 19.50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा तसेच अन्य आवश्यक विकासकामांसाठी या निधीचा वापर करण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात बैठकीत विकासकामांवर चर्चा

भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघातील विविध विकासकामे, स्थानिक पातळीवरील समस्या आणि आगामी काळातील विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला समान पद्धतीने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आमदार सावंत यांनी जाहीर केला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या भागातील प्राधान्याची कामे सुचवावीत आणि त्यानुसार विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीसह अन्य निधी देण्याचे आश्वासन

केवळ दीड कोटी रुपयांच्या निधीपुरतेच मर्यादित न राहता जिल्हा नियोजन समितीसह अन्य उपलब्ध निधीतूनही मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळवून देण्याचे आश्वासन आमदार सावंत यांनी दिल्याचे बैठकीत उपस्थितांनी सांगितले.

गरज भासल्यास जनतेच्या आवश्यक कामांसाठी स्वतःच्या पातळीवरही मदत करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या गोटात निधी वाटपावरून नाराजीची चर्चा

दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांमध्ये निधी वाटप आणि निर्णय प्रक्रियेतील अधिकारांबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे. सदस्यांना विश्वासात न घेता काही विकासकामांबाबत निर्णय घेतले जात असल्याची खदखद काही सदस्यांकडून व्यक्त होत असल्याचे सांगितले जाते.

काही उभरत्या नेतृत्वाच्या जनसंपर्क आणि राजकीय हालचालींकडे पक्षांतर्गत पातळीवर लक्ष ठेवले जात असल्याचीही चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर एका सदस्याची गाडी काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सहा सदस्यांनी आमदार सावंतांची भेट घेतल्याची चर्चा

या पार्श्वभूमीवर आठपैकी सहा सदस्यांच्या एका टीमने महायुतीतील सहयोगी पक्षाचे आमदार तानाजीराव सावंत यांची पुणे येथे भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत स्थानिक विकासकामे, निधी वाटप आणि मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

याच बैठकीनंतर प्रत्येक जिल्हा परिषद गटाला समान निधी देण्याची घोषणा करण्यात आल्याने या निर्णयाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

समान निधी देण्याच्या निर्णयाचे स्वागत

मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा समान विचार करून निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

“मतदारसंघातील प्रत्येक गटाला समान न्याय देत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत विकासकामे पोहोचण्यास मदत होईल,” अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

भूम तालुक्याच्या वतीने आमदार सावंतांचे आभार

या निर्णयाबद्दल नगरपालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे, पंचायत समिती सदस्य प्रशांत मुंडेकर, भाऊसाहेब मारकड, भाऊसाहेब घरत, संतोष लोखंडे, खंडेराव गोयकर आणि दत्ता नलवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भूम तालुक्याच्या वतीने आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे जाहीर आभार मानले.

दरम्यान, 13 जिल्हा परिषद गटांना प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या घोषणेमुळे भूम, परंडा आणि वाशी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रत्यक्षात कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाते आणि निधीचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो, याकडे स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!