भर रस्त्यातच जेवणाचा पंगत; वडीगोद्रीत मराठा बांधवांचा अनोखा रास्ता रोको

धुळे–सोलापूर महामार्गावर आंदोलनाचा जोर; रस्त्यावरच बसून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

यशश्री अपडेट्स | वडीगोद्री :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्री येथे मराठा बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत धुळे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी चक्क भर रस्त्यातच जेवणाची पंगत मांडत जेवण केले. त्यामुळे आंदोलनाचे हे अनोखे दृश्य चर्चेचा विषय ठरले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

वडीगोद्री परिसरातील धुळे–सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या देत वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही आंदोलकांनी भर रस्त्यातच जेवणासाठी बसत आपला निषेध व्यक्त केला. ‘आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

रस्त्यावरच जेवणाची पंगत बसल्याने या आंदोलनाकडे नागरिकांचे आणि वाहनचालकांचे लक्ष वेधले गेले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, वडीगोद्री परिसरात यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून धुळे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन पुन्हा एकदा महामार्गावर तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सरकारने तातडीने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!