वैरागमध्ये राजकीय उलटफेर! १५ नगरसेवकांसह धाराशिव भाजप युवा मोर्चाचे मा.जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी शिवसेनेत

यशश्री अपडेट्स | मुंबई :
वैराग नगरपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह तब्बल १५ नगरसेवक आणि  धाराशिव भाजप युवा मोर्चाचे मा जिल्हाध्यक्ष प्रतीक (बप्पा) राजकुमार रोचकरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील नंदनवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वैराग परिसरातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या नेतृत्वावर व विचारधारेवर विश्वास व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वैराग नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. एकाचवेळी नगरपंचायतीतील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि युवा नेतृत्व शिवसेनेत दाखल झाल्याने वैराग परिसरातील स्थानिक राजकारणात या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नगरपंचायतीतील शिवसेनेची ताकद वाढली

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि १५ नगरसेवकांच्या प्रवेशामुळे वैराग नगरपंचायत क्षेत्रात शिवसेनेला संघटनात्मकदृष्ट्या मोठे बळ मिळाले आहे. आगामी काळात नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या तसेच स्थानिक प्रश्न अधिक प्रभावीपणे प्रशासनासमोर मांडण्यासाठी या संघटनात्मक ताकदीचा उपयोग केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वैराग परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रितपणे काम करणार असल्याचेही सांगण्यात आले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाला बळ

धाराशिव लोकसभा मतदारसंघात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सातत्याने मजबूत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व, विकासाची भूमिका आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कार्यपद्धती यामुळे शिवसेनेशी जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.

वैराग नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रवेशामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

प्रतीक रोचकरी यांच्या प्रवेशाने युवा संघटनेलाही बळ

धाराशिव भाजप युवा मोर्चाचे मा जिल्हाध्यक्ष प्रतीक (बप्पा) राजकुमार रोचकरी यांनीही याच कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. युवा नेतृत्व म्हणून तुळजापूर आणि परिसरात सक्रिय असलेल्या प्रतीक रोचकरी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या युवा संघटनेला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

युवा कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि संघटनात्मक अनुभव यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या युवा संघटनेची बांधणी अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“हा केवळ पक्षप्रवेश नसून विकासाची नवी सुरुवात”

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना म्हटले की, “वैराग नगरपंचायतीतील नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच तुळजापूर येथील श्री. प्रतीक रोचकरी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करू.”

ते पुढे म्हणाले, “हा केवळ पक्षप्रवेश नसून वैराग परिसराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची नवी सुरुवात आहे. येणाऱ्या काळात वैराग परिसरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या प्रश्नासाठी शिवसेना ताकदीने उभी राहील.”

शिवसेना परिवारात प्रवेश करणारे मान्यवर

  • सौ. सुजाता संगमेश्वर डोळसे – नगराध्यक्षा
  • श्री. निरंजन प्रकाश भुमकर – उपनगराध्यक्ष
  • श्री. अजयकुमार शिवाजी काळोखे – नगरसेवक
  • श्री. अक्षय विठ्ठल ताटे – नगरसेवक
  • सौ. जयश्री खंडेराया घोडके – नगरसेविका
  • श्री. अतुल अशोक मोहिते – नगरसेवक
  • श्री. नागनाथ नामदेव वाघ – नगरसेवक
  • सौ. तृप्ती निरंजन भुमकर – नगरसेविका
  • सौ. अनुप्रिया आनंद घोटकर – नगरसेविका
  • सौ. गुरुबाई संजय झाडमुखे – नगरसेविका
  • सौ. आसमा नयुम मिर्झा – नगरसेविका
  • श्रीमती पद्मिन आप्पाराव सुरवसे – नगरसेविका
  • श्रीमती जैतुनबी गफूर बागवान – नगरसेविका
  • सौ. सविता विनायक खंदाड – नगरसेविका
  • श्रीमती रहेमून अकबर शेख – नगरसेविका
  • श्री. प्रतीक रोचकरी – भाजप युवा मोर्चाचे मा जिल्हाध्यक्ष धाराशिव

या पक्षप्रवेशामुळे वैराग व तुळजापूर परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवसेना परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि असंख्य कार्यकर्त्यांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मनःपूर्वक स्वागत केले. वैरागच्या स्थानिक राजकारणातील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे आगामी काळात परिसरातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!